लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सातारा, शाहूपुरी पोलिसांनी सातारा शहर व परिसरात कायदा मोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईची मोहीम तीव्र केली. यामधून दिवसभरात हजारो रुपयांचा दंड वसूल झाला आहे; तर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शहरात पाहणी करून कायदा व सुव्यवस्थेबद्दल पोलिसांना सूचना केली.
नववर्ष स्वागताच्या निमित्ताने सातारा शहरासह परिसरातील माहोल बदलून गेला आहे. यानिमित्ताने अनेक वाहनधारक कायदा मोडत आहेत. मद्यप्राशन करून वाहन चालविणे, ट्रीपल सीट जाणे, सीट बेल्ट न लावणे आदी नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. बुधवारपासूनच या कारवाईला वेग आला आहे. त्यावेळी दीड लाखाचा दंड या कारवाईतून वसूल करण्यात आला, तर गुरुवारी ही मोहीम आणखी तीव्र करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत पोलीस शहरातील चौका-चौकात वाहनांची तपासणी करत होते.
दरम्यान, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी रात्री शहरात पाहणी केली. तसेच पोलिसांशी संवाद साधत कारवाईची माहितीही घेतली.
फोटो दि.३१सातारा पोलीस फोटो...
फोटो ओळ : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील विविध भागात कायदा मोडणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. या पोलिसांशी गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी संवाद साधला.
.......................................................