खटाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याचे पालन सर्वांनीच करणे गरजेचे असताना काहीजण सहज फिरावयास गेल्यासारखे रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसत आहेत. खटावमध्ये पुसेगाव पोलीस स्थानकाच्यावतीने नाकाबंदी करत दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची दांडी गुल होत आहे.
बाहेर पडण्यास मनाई असतानाही काहीही कारण सांगून लोक घराबाहेर पडून कोरोनाचे वाहक बनत आहेत. काही नागरिक दक्षता घेताना दिसत नाहीत. नियमांचा भंग करणाऱ्या अशा लोकांवर पोलीस प्रशासनाचे आता बारीक लक्ष आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार विनामास्क फिरणाऱ्या तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता, वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनांवरही पोलिसांची नजर असून, या सर्वांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहेच, प्रसंगी वाहन जप्त करून कारवाई अधिक कडक केली जात आहे.
याही प्रसंगात पोलिसांशी हुज्जत घालून काही बेताल नागरिक आपली मुजोरी दाखवत आहेत. तर कोरोनाचे गांभीर्य नसलेल्या लोकांना कायद्याचा बडगा दाखवताना प्रसंगी लोकांना कोरोनाविषयी प्रबोधनपर समजावून सांगताना पोलिसांची स्थिती कोरोनाच्या या कठीण काळात ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी झाली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, कोरोनाचा प्रसार थांबविण्याकरिता ‘घरीच राहा सुरक्षित राहा’, असे सल्ला देण्याचे काम आता पोलिसांवर आले आहे.
===Photopath===
160521\20210516_130358.jpg
===Caption===
खटाव मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनाकारण फिरणाऱ्यावर पोलिकांची करडी नजर