वाई : वाईमध्ये शिवजयंती, ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस संचालन करण्यात आले. वाई पोलिसांनी ईद व शिवजयंतीच्या निमित्ताने तसेच लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून किसनवीर चौक ते मशिदीपासून रविवार पेठेतील चावडी चौक, परटाचा पार, जैन मंदिर, मार्गे भाजी मंडई आमंत्रण चौक मार्गे पोलीस ठाणे असे संचलन करण्यात आले.नागरिकांना यावेळी आवाहन करण्यात आले की, शिवजयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन व जमावबंदीचे आदेश असल्याने सामुदायिकरीत्या साजरी करता येणार नाही. तरी शिवभक्तांनी आपापल्या घरातच राहून ती साजरी करावी. तसेच ईद हा सण मशिदीत जाऊन नमाज पठण करू नये तर घरीच नमाज पठण करावे.
जिल्हा प्रशासनाने बंद केलेल्या मस्जिद दर्गा या प्रार्थनास्थळी गर्दी होऊ नये म्हणून कुलूप बंद ठेवली आहेत. शिवजयंती आणि ईद या कार्यक्रमादरम्यान नागरिकांकडून नियम व अटींचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी केले आहे. याचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.