एकेकाळी शिवसेनेचे निष्ठावंत आणि पहिल्या फळीतील नेते असलेले एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण हादरलं आहे. शिंदे गटासोबत शिवसेनेचे ५४ पैकी सुमारे ३८ आमदार आहेत. त्यामुळे लवकरच शिंदे गट महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता आहे आणि असे झाल्यास शिंदे गट भाजपासोबत सत्तास्थापना करण्याचीही तयारी दर्शवत आहे. पण या साऱ्या रणधुमाळीमध्ये महाविकास आघाडीचे अस्तित्व धोक्यात आले असून सरकार कोसळण्याची तीव्र शक्यता लक्षात घेत, शिवसेना खासदार संजय राऊत बंडखोरांना राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याचं चॅलेंज दिलं आहे. तर दुसरीकडे बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा राज्य सरकारने काढली. त्यानंतर आता गुवाहाटीमध्ये पंचतारांकित हाॅटेलमध्ये ठाण मांडून बसलेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार झटका देत शिंदेंच्या मूळगावी साताऱ्यातील दरे येथे असलेल्या बंगल्याला असलेला बंदोबस्त देखील पोलिसांनी हटवला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील मूळ गावी असलेल्या बंगल्याला असलेला बंदोबस्त पोलिसांनी काढला आहे. पेट्रोलिंग करत बंगल्यावर पोलिसांची नजर असल्याचे पोलीस अधीक्षकांनी म्हटले आहे. मात्र, गावातील घराचा बंदोबस्त हटवण्यात आल्यानतंर राजकारण सुरू झाल्याची चर्चा गावात सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातील दरे हे एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव आहे. या ठिकाणी त्यांचे अधूनमधून येणं-जाणं असते.
शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यभरातील शिवसैनिकसंतापले आहेत. शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर हल्ला केला जात आहे. अनेक ठिकाणी बॅनरही फाडून टाकले आहेत. बॅनरना काळंही फासलं जात आहे. तर काही ठिकाणी बंडखोर आमदारांचे प्रतीकात्मक पुतळे जाळले जात आहेत. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी तुम्ही एका बापाचे असाल तर राजीनामे द्या आणि निवडणूक लढवून दाखवा असं आव्हान बंडखोर आमदार यांना दिलं आहे.