सातारा : निगडी, ता. सातारा येथील वनक्षेत्र हद्दीत दोन वाघरी लावून वन्यप्राण्यांची शिकार करण्याचा प्रयत्न वनाधिकारी यांनी उधळून लावला. याप्रकरणी दोघांना वनकोठडी सुनावण्यात आली आहे.
निगडी येथील सुनील साळुंखे व युवराज ऊर्फ विकास संपत पवार या दोघांना या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. सुनील साळुंखे व विकास पवार हे दोघे निगडी गावच्या वनक्षेत्रात वाघरी लावून शिकारीच्या प्रयत्नात असल्याची माहिती वनविभागाला सायंकाळी सहाच्या दरम्यान मिळाली.
वनविभागाने तत्काळ निगडी वनक्षेत्रामध्ये सापळा लावला. त्यामध्ये सुनील साळुंखे व विकास पवार हे दोघेही आरोपी अलगद वनविभागाच्या जाळ्यात अडकले. आरोपींकडे २ वाघरी, १ कु-हाड, निरगुडीच्या काटक्या आदी शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य मिळून आले. वनविभागाने पुढील तजवीज तपासासाठी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. २७ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने दोन्ही आरोपींना वनकोठडी ठोठावली आहे.
जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापासातारा : समर्थ मंदिर येथील पानटपरीच्या आडोशाला सुरू असणाºया जुगार अड्ड्यावर छापा टाकून शाहूपुरी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी ११२० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले.
शुभम महेंद्र गंगावणे (वय २२, रा. करंडी, ता. सातारा) असे ताब्यात घेतलेल्याचे तर समीर सलीम कच्छी (रा. मोळाचा ओढा, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. कच्छी हा पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबतची नोंद शाहुपुरी पोलिसात झाली असून संशयीतांचा शोध घेतला जात आहे.
वडजल परिसरात एकाचा गळा चिरून खूनफलटण : फलटण तालुक्यातील वडजल परिसरात एकाचा गळा चिरून खून करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वडजल गावातील एका शेतात अंदाजे ५० ते ६० वयाच्या पुरुषावर अज्ञातांनी धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून करण्यात आला आहे. या खुनाचे कारण स्पष्ट झालेले नसून पोलीस कसून तपास करत आहेत. अद्याप मृतदेहाची ओळख पटली नाही. घटनास्थळी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.