सातारा : नगरसेवक बाळू खंदारे गेल्या पंधरा दिवसांपासून सातारा पोलिसांना सापडलेला नाही. दोन दिवसांपूर्वी सातारा शहर पोलिसांच्या एका पथकाने बाळू खंदारे याच्या साताऱ्यातील घराची झडती घेऊन काही सापडते का याचा शोध घेतला. मात्र काही सापडले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांचीही कसून चौकशी केली. त्याच्या शोधार्थ दोन पोलीस पथके पुण्याला रवाना करण्यात आली असून, त्याचा नेमका ठावठिकाणा पोलिसांना आढळून आलेला नाही.
सातारा येथे काही दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले समर्थक सनी भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले समर्थक नगरसेवक बाळू खंदारे यांच्यात झालेल्या राड्यात लोखंडी रॉड, गुप्ती, कोयता तसेच अन्य धारदार शस्त्रांचा वापर झाला होता. यावेळी सनी शिंदे समर्थक असलेले केवल जाधव, अजय जाधव, अजिंक्य भोईटे, शुभम भोसले यांना मारहाण केली होती.
या घटनेनंतर सातारा शहर परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी सनी भोसले यांनी तक्रार दिल्यानंतर बाळू खंदारे, आकाश नेटके, शुभम भिसे, ओंकार कांबळे, निखिल कीर्तीकर, विशाल ऊर्फ शैलेश बडेकर यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. यानंतर दोन दिवसांनी शैलश बडेकर याला अटक केली होती.