पळशी : माण तालुक्यातील पळशी येथे अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने काही दिवसांपासून सुरू आहेत. वारंवार सूचना देऊनही दुकानदार कानाडोळा करत होते. सोमवारी कोेरोनाच्या अनुषंगाने म्हसवड पोलीस पळशी गावात पेट्रोलिंग करत असताना सहा दुकाने सुरू असल्याचे निदर्शनास आले. परवानगी नसतानाही दुकाने सुरू ठेवल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे येथील सहा दुकानांवर पोलिसांनी कारवाई केली.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे, पोलीस शिपाई नितीन धुमाळ, अभिजित भादुले, पोलीसपाटील यशवंत गंबरे, सरपंच शंकर देवकुळे, आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. गावात कारवाई सुरू असल्याचे समजताच दुकाने बंद करण्यासाठी दुकानदारांची गडबड सुरू होती. कारवाईमध्ये तीन मोबाईल शॉपी, दोन कापड दुकाने व एका लेडीज कॉर्नर दुकानाचा समावेश आहे.
गाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत वेगाने वाढ होत असून, रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असूनदेखील रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सोमवारी येथील काही दुकानदारांवर कारवाई झाल्याने विनापरवानगी दुकाने सुरू ठेवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
सध्या पळशी गाव परिसरात कोरोनाचे जवळपास ५० रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या दर आठवड्याला एक-दोनने वाढतच असल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे. गेल्या महिनाभरापासून पळशी गाव प्रतिबंधित झोनमध्ये असून, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत. रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने पुढील दहा दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंदच ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे.
फोटो : २१पळशी
पळशी (ता. माण) येथे जिल्हाधिकारी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे सहा दुकानांवर पोलिसांनी कारवाई केली.