दत्ता यादव।सातारा : गलेलठ्ठ पगार असल्यामुळे जो तो आयटी क्षेत्राकडे वळत असतो. सध्या आयटी क्षेत्राला महत्त्व प्राप्त झाले असताना दुसरीकडे मात्र अंगात खाकी वर्दी घालण्याचे स्वप्न हेच आयटी अभियंते पाहत असल्याचे दिसून येत आहे. सातारा येथे सुरू असलेल्या पोलीस भरतीला १३ अभियंते आणि एमएस्सी, बीएड, बीएस्सी, एमएड असे उच्च शिक्षण झालेले कितीतरी युवक आल्याचे पाहायला मिळत आहे.
येथील पोलीस परेड मैदानावर पोलीस भरती सुरू आहे. या भरतीला विविध ठिकाणांहून पाच हजारांहून अधिक मुले-मुली आले आहेत. यातील काही मुलांशी ‘लोकमत’ टीमने संवाद साधला असता अनेकजण उच्चशिक्षित असल्याचे दिसून आले. निमशासकीय नोकरीमध्ये स्पर्धा आणि स्थिरता नसल्यामुळे अनेकजण शासकीय नोकरी मिळण्यासाठी धडपडत असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. फलटण येथील मंगेश जाधव हा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे. पुण्यामध्ये त्याने दोन वर्षे नोकरी केली. मात्र, त्याला यात फारसी गोडी लागली नाही.
आपण एमपीएसीद्वारे अधिकारी व्हावे, असे त्याला वाटू लागले. त्यामुळे त्याने पुण्यातील जॉब सोडण्याचा निर्णय घेतला. सध्या मंगेश एमपीएसीचा अभ्यास करतोय. परंतु अधिकारी होण्यापूर्वी पोलिसांत भरती व्हायचा निर्धार त्याने केलाय.कोरेगाव येथील सोपान तरटे हा युवकही मॅकेनिकल डिग्रीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. त्याला खाकी वर्दीचा प्रचंड लळा आहे. आयुष्यात पैसा येतो, जातो. परंतु स्वत:ची काहीतरी ओळख असावी आणि यातून समाजकारण व्हावे, हा हेतू ठेवून मी पोलीस खात्याकडे आकर्षित झालो, असल्याचे तो सांगतो. इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत असलेल्या वाईच्या मिलिंद सराटेचे मात्र, या उलट मत आहे.
बेरोजगारी वाढत असून, शासकीय नोकरीला प्राध्यान्य आहे, त्यामुळेच मी पोलीस भरतीला आलो असल्याचे त्याने सांगितले. खंडाळ्याती मानसी भोईटे, प्रियांका भोसले, वैशाली गायकवाड, अनुजा माळी, प्राजक्ता डोईफोडे, मीनल डोईफोडे, अपूर्वा गायकवाड या मुलींमध्येही कोणी बीएससी, बीएड झाल्या आहेत. स्वत:च्या पायावर उभे राहून कुटुंबाला आर्थिक हातभार मिळेल, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून त्या पोलीस भरतीला आल्या आहेत.शिक्षण सांगण्यास कमीपणा..आपण शिक्षण खूप घेतलं. परंतु आपल्या मनासारखी नोकरी मिळाली नाही म्हणून अनेकांनी पोलीस भरतीचा मार्ग स्वीकारल्याचे दिसून आले. शिक्षण घेऊन काहीच उपयोग झाला नसल्याची खंतही पोलीस भरतील आलेल्या अनेक युवकांच्या बोलण्यातून जाणवत होती. त्यामुळे अनेक युवकांना स्वत:चे शिक्षण सांगण्यास कमीपणा वाटत होता.