वडूज : वडूज येथील काही युवकांनी डांभेवाडी येथे ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू असताना पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की केल्याप्रकरणी पाचजणांवर व दोनजणांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दहशत पसरविल्याप्रकरणी दोघांना वडूज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळ व पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, खटाव तालुक्यातील डांभेवाडी येथे शुक्रवार, दि. १५ रोजी मतदान सुरू होते. यावेळी नीलेश अशोक जाधव, साईनाथ अरुण जाधव, संदीप शिवाजी पवार, रोहित शिवाजी पवार, सुरेश ऊर्फ बाबू जाधव व अनोळखी दोन व्यक्तींनी यलमरवाडी रस्त्यावरील मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या बाहेर मतदार नसतानाही जमाव जमविला. डांभेवाडी येथे मतदार यांच्यावर दबाव टाकण्याच्या हेतूने गोंधळ घालून जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू असताना पोलिसांना मिळून आले.
दरम्यान, पोलिसांनी त्यांना ‘इथे का आलात? तुम्ही येथून निघून जावा,’ असे सांगितले. मात्र त्या युवकांनी ‘आम्ही येथून जाणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा,’ असे म्हणून पोलिसांशी हुज्जत घातली. सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकामी पोलिसांनी त्या युवकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली असता त्या युवकांनी पोलिसांनाच धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी त्या युवकांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलात? आहे. दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर तपास करीत आहेत.