वरकुटे-मलवडी : “महाराष्ट्रातील इतर भागांच्या तुलनेत सातारा जिल्ह्यातील औद्योगिकीकरण थांबलं आहे. अशावेळी लोकप्रतिनिधींच्या नावावर चुकीचे काम करणाऱ्यांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा. त्याचबरोबर विकासकामांसह औद्योगिकीकरणाला अडथळा निर्माण करणाऱ्यांनाही उचलावे,” अशी स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. वरकुटे मलवडी, ता. माण येथे माण-खटाव या दुष्काळी तालुक्यासाठी टेंभूचे अडीच टीएमसी पाणी आरक्षित करून वचनपूर्ती केल्याबद्दल आयोजित भव्य कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार दीपक चव्हाण आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
“औद्योगिकीकरण करणं काळाची गरज आहे. भविष्यात सातारा-पंढरपूर रस्त्यावर एमआयडीसी आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. दुष्काळी माण-खटावबद्दल आपुलकीची भावना शरद पवार यांच्या मनात असून, कोणी तरी खंबीर माणूस कोणत्याही योजनेच्या मागे असल्याशिवाय ती यशस्वी होत नाही. राज्याला निधी देणारा मी वाढप्या आहे. येथील जनतेच्या विकासासाठी जास्त देता येईल, तेवढा निधी देण्याचा प्रयत्न करेन; परंतु रस्ते आणि औद्योगिकीकरणाच्या कामाला विनाकारण विलंब होतोय. दिवसेंदिवस महागाई वाढतेय, तसेच कॉन्ट्रॅक्टरला त्रास देणाऱ्यांनाही सुज्ञ जनतेनं धडा शिकवला पाहिजे. माण-खटाव भागातील शेतकरी कष्टाळू असून, दुष्काळ असला तरी सातत्याने समाधानाची शेती करतोय. यासाठी आशिया खंडातील सर्वांत मोठ्या टेंभू जलप्रकल्प योजनेतून इथली हजारो हेक्टर शेती हिरवीगार करणार आहे,” असं पवार म्हणाले.
“राज्यात आघाडी सरकार आल्यापासून इथल्या जनतेला पाण्याचं आश्वासन देणाऱ्या लोकप्रतिनिधींचा पत्ताच नाही. या भागातील जनतेसह शेतकऱ्यांसाठी प्रभाकर देशमुख सातत्यानं आणि आग्रहाने पाण्याची मागणी करीत आहेत. त्यांच्याच प्रयत्नातून अडीच टीएमसी पाणी माण-खटावच्या ५७ गावांना मिळतंय. ज्या पाण्यासाठी आपण अखंडपणे लढा दिला, ते पाणी पुढील डिसेंबरच्या दरम्यान, येथील शिवारात बघायला मिळेल,” अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, “इथल्या कणखर शेतकऱ्यांनी बरीच वर्षे दुष्काळ सोसला. कृष्णा-कोयनेचं पाणी श्रावण महिन्यात देवांना अर्पण करण्याची इथली परंपरा. जी कृष्णा-कोयनामाय माझ्या जन्मगावातून वाहते, तेच पाणी माण-खटावच्या अंगणात आलंय, याचा मला सार्थ अभिमान आहे.”
प्रभाकर देशमुख यांच्याकडून अपेक्षा व्यक्त...‘जो अन्न, पाणी देतो त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संस्कृती माण-खटाव तालुक्याची आहे. ज्या ठिकाणी कुठलेही पाणी येणे अशक्य होते, अशा ठिकाणी पाणी आरक्षित करून दिल्याबद्दल आघाडी शासनाचे धन्यवाद. तसेच दहीवडी, वडूजमधील क्रीडा संकुले अपूर्ण असून, म्हसवड आणि वडूज येथील बसस्थानकाची कामेही प्रलंबित आहेत. ती तत्काळ कार्यान्वित व्हावीत, अशी अपेक्षा प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केली. अभयसिंह जगताप यांनी माण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांद्वारे होणारा विकास स्पष्ट केला.