खंडाळा : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी गावोगावी प्रशासनाकडून पुन्हा खबरदारी घेतली जात आहे. तरीही कोरोनाचा प्रसार पुन्हा हळूहळू वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी खंडाळा शहरात पोलिसांनी धडक मोहीम राबवित बेजबाबदार नागरिकांना चपराक दिली.खंडाळा शहरात नगरपंचायत व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विनामास्क फिरणाऱ्या नागरिक व विनाकारण फिरणारे वाहनचालकांवर कडक कारवाई केली जात आहे. शहरातील प्रत्येक चौकात पोलीस प्रशासनाने चेक नाके करून तपासणी केली जात आहे. दवाखान्यात जाणारे लोक सोडून इतर कारणास्तव बाहेर पडणाऱ्या लोकांना फिरण्यासाठी अटकाव केला आहे.
खंडाळा शहरात पोलिस निरिक्षक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक लोकांवर नजर ठेवून विना मास्क व विनाकारण फिरणाऱ्यांना तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे. त्याचबरोबर अनेक वाहनचालकांची वाहने ताब्यात घेतली आहे. त्यामुळे त्यांना चांगलीच चपराक बसली.भरारी पथकाची निर्मितीकोरोनाच्या भीषण वास्तवाशी सामना करताना ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी व गावात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी लोकांवर नजर ठेवणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाने भरारी पथकांची निर्मिती केली आहे. यामध्ये नायगाव, भादे, खेड बुद्रुक, बावडा, पळशी, शिरवळ अशा सहा गणासाठी प्रत्येकी एक भरारी पथक तैनात करण्यात आले आहे. या गणातील प्रत्येक गावात जाऊन विनामास्क फिरणाऱ्यांना पाचशे रूपये तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड करण्यात येत आहे.
खंडाळा शहरासह परिसरातील गावातून लोकांनी विनाकारण बाहेर पडू नये. यासाठी पोलीस यंत्रणा सजग आहे. सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करीत आहोत. कोरोनाला आळा घालण्यासाठी लोकांनी सहकार्य करावे.- महेश इंगळे,पोलीस निरिक्षक, खंडाळा