सातारा : गायकवाडवाडी, ता. कराड येथील किशोर रामचंद्र गायकवाड (वय २८) याचे रेडिएशन पॉवरच्या पैशाच्या कारणावरून हिंदी चित्रपटाच्या कथेप्रमाणे झालेले अपहरण व खुनाचा स्थानिक गुन्हे शाखा व उंब्रज पोलिसांनी उलगडा केला आहे. याप्रकरणी सर्जेराव राजवस-सावंत ऊर्फ महाराज, सागर देसाई व राहुल शिंदे (सर्व रा. नेर्ले, ता. वाळवा, जि. सांगली) यांना अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, किशोर गायकवाड यांचे १३ जुलै २०१७ रोजी कारसह बेपत्ता झाल्याची तक्रार उंब्रज पोलिसांत दिली होती. मात्र, पोलिसांना त्याचा शोध घेण्यास यश येत नसल्याने त्यांच्या नातेवाइकांनी संदीप पाटील यांना शोध घेण्याची विनंती केली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली. त्यांनी तीन ते चार जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली.
त्यातील मुख्य सूत्रधार सर्जेराव सावंत, त्याचा मेव्हणा सागर देसाई व साथीदार राहुल शिंदे यांनी किशोर गायकवाडकडून रेडिएशन पॉवर व्यवसायासाठी ११ लाख रुपये घेतले होते. त्यामुळे किशोरने वारंवार मागितले असता सावंत यांच्याकडून टाळाटाळ होत होती.
या त्रासाला कंटाळून सावंत याने सागर व राहुल यांच्या मदतीने पूर्वनियोजित कट केला. एका फ्लॅटमध्ये पैसे देण्याच्या बहाण्याने बोलावून क्लच वायरने किशोरचा गळा आवळून व लोखंडी रॉडने डोक्यामध्ये मारून गंभीर दुखापत करून त्याचा खून केला. त्यानंतर तो मृतदेह कारच्या डिकीमध्ये टाकून कोल्हापूरमधील विशालगडाच्या घनदाट जंगलामध्ये कड्यावरून कडेलोट करून दिला. त्यानंतर कोणाला संशय येऊ नये, म्हणून किशोरचा मोबाईल स्वत:जवळ ठेवून तो पुणे, मुंबई परिसरात फिरवला. तिकडेच टाकून दिला. त्यानंतर किशोरची गाडी पुणे, मुंबई, नाशिक, नगरमार्गे अकलूजमधील एका अडगळीच्या ठिकाणी सोडून दिल्याची कबुली दिली.