सातारा : जिल्ह्यात गुरुवारपासून संचारबंदी सुरू झाल्यानंतर अनेक वेगवेगळ्या समस्या आणि किस्से पाहायला मिळाले. अनेकजण काहीही कारण सांगून घराबाहेर पडत होते. अशा प्रत्येकाला अडवून पोलिसांना विचारावे लागत होते. कुठे चाललाय, काय काम आहे, असे सतत प्रश्न विचारून पोलिसांची अक्षरश: दमछाक झाली. सरतेशेवटी पोलिसांनी विचारणे बंद केले.
जिल्ह्यात जमावबंदी आणि संचारबंदी सुरू आहे. याचे पालक होण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. जिल्ह्यात १९०० पोलिसांचा बंदोबस्त असून, सर्व अधिकारीही फील्डवर उतरले आहेत. चाैकाचाैकात तपासणी केंद्रे उभारली आहेत. सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत पोलिसांनी प्रत्येकाकडे कसून चाैकशी केली. काही जणांना ठोस कारण सांगता आले नाही, अशा लोकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. अनेकजण किराणा माल, लसीकरण, कोरोना टेस्टसाठी घराबाहेर पडले होते. ज्यांची कारणे खरी होती. त्यांना पोलिसांनी सोडून दिले. मात्र, थातूरमातून कारणे सांगण्याऱ्यांना पोलीस घरी पिटाळून लावत होते.
सातारा शहरात विशेषत: पोवई नाका, विसावा नाका आणि राजवाडा परिसरात नेहमीसारखीच नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. संचारबंदी काय असते, हेही अनेकांना माहिती नव्हते. दुकाने बंद नाहीत, म्हणजे आपण बाहेर जाऊ शकतो, अशी धारणा लोकांची झाल्याचे दिसून आले. साताऱ्यात दुपारी मात्र रस्त्यावर शुकशुकाट होता. शहरातील मुख्य चाैकांमध्ये पोलिसांनी बॅरिकेट्स लावले होते. त्यामुळे फारसी वर्दळ नव्हती. संध्याकाळी सहानंतर मात्र, नेहमीप्रमाणे नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले. अशा लोकांना मात्र पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. ठोस कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे प्रशासनाने सांगितले असले तरी अनेकजण कोणतेही निमित्त करून घराबाहेर पडत असल्याचे दिसून आले. गुरुवारी संचारबंदीचा पहिला दिवस होता. त्यामुळे पोलिसांनी फारसे कडक धोरण अवलंबले नाही. पोलिसांकडून शुक्रवारपासून अत्यंत कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
चाैकट : जसा आदेश तशी अंमलबजावणी...
गतवर्षी लाॅकडाऊनमध्ये पोलिसांनी प्रचंड कडक अंमलबजावणी केली. मात्र, यंदा याउलट स्थिती आहे. पोलिसांना केवळ साैम्य आदेश देण्यात आले आहेत. लाठीहल्ला, मारझोड करून नये, अशा सूचनाही देण्यात आल्या असल्याचे समजते. जो कोणी ऐकत नाही, अशांवर दंडात्मक कारवाई अगदीच वेळ पडल्यास संबंधितांवर गुन्हेही दाखल केले जाणार आहेत.