सातारा - संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणा-या वाई हत्याकांडामध्ये आणखी नव नवे खुलासे होत असून डॉ. संतोष पोळने म्हणे आणखी तीसजणांचे खून केल्याचा दावा केला असून, या नव्या दाव्यामुळे पोलिस संभ्रमात पडले आहेत. संतोष पोळ हा दिशाभूल करत असून मात्र, तरीसुद्धा तपासाचा भाग म्हणून त्याचा तपास घेण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली असल्याचे पोलिसांनी सांगितले.संतोष पोळने सहा खून केल्याचे उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र हादरून निघाला होता. एकापाठोपाठ सहा खुनांची मालिका समोर आल्याने डॉ. संतोष पोळचा खरा चेहरा उघड झाला. सुरुवातीला तो मी नव्हेच अशा आविर्भावात असलेल्या संतोष पोळने पोलिसी खाक्यानंतर सहा खुनांची कबुली दिली. मात्र, एवढ्यावरच न थांबता त्याने त्याचवेळी आणखी तीसजणांचे खून केले आहेत, असा दावा वाई पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनायक वेताळ यांच्याकडे केला होता. मात्र त्याचा हा दावा पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी असल्याचे वेताळ यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. संतोष पोळला अटक केल्यानंतर अनेकदा न्यायालयात नेण्यात आले. त्यावेळी त्याने न्यायालयासमोर का सांगितले नाही. आपण ३० खून केले म्हणून. असा प्रश्न उपस्थित करत वेताळ म्हणाले, ज्यावेळी ज्योती मांढरे माफीची साक्षीदार झाल्यानंतर आपण या प्रकरणात अडकलो असल्याचे त्याला जाणवले असेल तेव्हा त्याची मानसिक स्थिती ढासळली. त्यामुळे तो काहीही बोलू लागला. एवढेच नव्हे तर आरोपपत्रामध्ये नमूद असलेल्या साक्षीदारांचीही नावे तो हे सर्वजण खून प्रकरणातील आरोपी आहेत, असे सांगत आहे. त्यामुळे त्याच्या बोलण्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे, असेही वेताळ यांनी सांगितले.दरम्यान, संतोष पोळने तीस खुनांचा दावा करून जवळपास आठ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र तरी सुद्धा खातरजमा म्हणून संतोष पोळकडे तपास करणे गरजेचे असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी न्यायालयाकडे तपासासाठी परवानगी मागितली आहे. आता यावर ९ आॅक्टोबरला सुनावणी होणार आहे.संतोष पोळ हा पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खोटे दावे करत आहे. त्याच्या म्हणण्यानुसार ३० खून केले आहेत. तर आमच्या डायरीमध्ये ३० जण बेपत्ता हवेत ना. जे बेपत्ता होते. त्यामध्ये काहींनी लग्न केले.- विनायक वेताळ (पोलिस निरीक्षक वाई)
संतोष पोळच्या ३६ खुनाच्या दाव्याने पोलिस संभ्रमात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 8:52 PM