पाटण : कोयनानगर येथे राज्य आपत्ती बचाव दल आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्र उभारण्याबाबत पुढील एका महिन्याच्या आत सविस्तर प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादरीकरण करण्यात येणार आहे,’ अशी माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी दिली.
कोयनानगर येथे नियोजित असलेल्या राज्य आपत्ती बचाव दल आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्राच्या सद्य:स्थितीचा आढावा गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी मुंबई येथे घेतला. हा प्रकल्प देसाई यांचे संकल्पनेतून साकारला जाणार आहे. या प्रकल्पाला तातडीने मूर्त स्वरूप देण्यासाठी शासन स्तरावर भक्कमपणे पाठपुरावा त्यांनी केला आहे. या बहुउद्देशीय प्रकल्पाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोयना धरणभेटीदरम्यान तत्त्वत: मान्यता दिली आहे. या प्रकल्पाचा आराखडा तयार करून तसा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
पावसाळ्यात सांगली, सातारा आणि कोल्हापूर भागात पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यावेळी मदत कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, पोलीस एसआरपीएफ आदी दलांची आवश्यकता असते. हे मदतकार्य लोकांपर्यंत जलदगतीने पोहोचविण्यासाठी कोयनानगर येथे नियोजित असलेले राज्य आपत्ती बचाव दल आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्र उभारण्याची गरज आहे.
या भागात सर्व सोईसुविधा आहेत. जागाही शासनाचीच असल्यामुळे जागेचाही अडसर दूर झाला आहे. या एसडीआरएफ आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्रासाठी ३२ हेक्टर अर्थात ८० एकर जागा उपलब्ध आहे. ती महसूल विभागाकडे वापरत नसलेली जागा आहे. ही जागा गृह विभागाला हस्तांतरित होणे गरजेचे आहे.
त्यासाठी गट/सर्व्हे क्रमांक २५, २६, २७ या क्षेत्रातील जमीन महसूल विभागाची आहे. ती जागा महसूल विभागाकडून गृह विभाग अथवा पोलीस महासंचालक कार्यालयाकडे हस्तांतरित करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महसूल विभागाकडे सादर करावा व त्यासाठी जलदगतीने पाठपुरावा करावा, असे निर्देश देसाई यांनी सातारा पोलीस अधीक्षकांना दिलेत.
अधिकाऱ्यांची उपस्थिती
मंत्रालयात झालेल्या या आढावा बैठकीला अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक संजय पाण्डेय, गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, अतिरिक्त पोलीस महासंचालक एस. जगन्नाथन, वित्त विभागाचे सहसचिव विवेक दहीफळे, साताराचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.