सातारा : वाढती बाल गुन्हेगारी चिंतेचा विषय असून त्यांना कायद्याचे अभय मिळत असले तरी बाल गुन्हेगारांवरही खटले चालवण्यासाठी पोलिस अधिक प्रयत्नशील राहतील, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी येथे दिली. सातारा जिल्हा पोलिस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी ते जिल्हा दौर्यावर असून त्यांनी आज, बुधवारी पत्रकार परिषद बोलवली होती. यावेळी पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर उपस्थित होते.आयजी फुलारी म्हणाले, देशभरात १८ वर्षाखालील बाल गुन्हेगारांचे प्रमाण वाढत आहे. गुन्हेगारी कृत्यांपासून मुलांना रोखण्यासाठी पालकांनी आणि समाजाने स्वत:हून पुढे आले पाहिजे. पोलिस सुरुवातीपासूनच प्रयत्नशील आहेत. मात्र कायद्याचाच आधार अल्पवयीन मुलांना मिळत असल्याने पोलिसांवर कारवाई करण्याच्या मर्यादा येतात. त्यातूनही पोलिस गंभीर व क्रूर घटनांमधील गुन्ह्यांचे चार्जशीट बनवून बाल न्यायालयात ते चालवण्यासाठी आग्रही राहतात.सातारा जिल्हा पोलिस दलाने बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी व युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी ’उंच भरारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. कम्युनिटी पोलिसिंगवर भर देत अनेक चांगले उपक्रम राबवले आहेत, अशा शब्दात त्यांनी एसपी समीर शेख यांचे कौतुकही केले. पोलिस अधीक्षक समीर शेख म्हणाले, जिल्ह्यात बाल गुन्हेगारी विरोधासाठी त्रिसुत्री उपक्रम राबवला जात आहे. रोजगार कौशल्य विकास, गावपातळीवरील खेळाडूंना व्यासपीठ व युवकांमध्ये वक्तृत्व, लेखन, चर्चासत्र राबवली जाणार आहेत. या माध्यमातून बाल गुन्हेगारी रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.उदयनराजेही बालगुन्हेगारी विरोधात..खासदार उदयनराजे भोसले यांनीही मंगळवारी आयजी सुनील फुलारी यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाली. खासदार उदयनराजे भोसले यांनीही वाढत्या बालगुन्हेगारी बाबत चिंता व्यक्त करुन कठोर निर्णय घेण्याची मागणी केल्याचे आयजी फुलारे यांनी यावेळी सांगितले. यावर पोलिस दल निश्चित प्रयत्नशील असल्याची माहिती आयजी सुनील फुलारी यांनी उदयनराजेंना दिली.
बाल गुन्हेगारांवरही खटले चालवण्यासाठी पोलिस प्रयत्नशील - विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी
By दत्ता यादव | Published: March 01, 2023 3:31 PM