सातारा : दरोड्याच्या चौकशीसाठी गेलेल्या दहिवडी पोलिसांना शंभर ते दीडशे लोकांच्या जमावाने रोखल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी लोकांची समजूत काढल्यानंतर जमाव पांगला. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.याबाबत अधिक माहिती अशी, मांडवे, ता. खटाव येथील गावामध्ये शनिवारी रात्री चाकूचा धाक दाखवून एका कुटुंबाच्या घरातील सुमारे एक लाखांचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली. या दरोड्याच्या तपासासाठी दहिवडी पोलीस ठाण्यातील दहा ते बारा पोलिसांचा गाड्यांचा ताफा दहिवडी परिसरातीलच विकासनगर झोपडपट्टी येथे रविवारी सकाळी गेला होता.
पोलिसांनी वस्तीवर जाऊन चौकशी सुरू केल्यानंतर शंभर ते दीडशे लोकांचा जमावाने पोलिसांना गराडा घातला. यामध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता. उलट पोलिसांनाच प्रत्त्युत्तर करून लोकांनी भांबावून सोडले. पोलिसांसमवेत हुज्जत घातली जात होती.
आमच्या वस्तीवरील मुलगी पळून गेली, तीचा शोध तुम्ही का घातला नाही, असा जाब संबंधित लोकांकडून पोलिसांना विचारला जात होता. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सुमारे दीड तासांपासून पोलिसांच्या गाड्या एकाच जाग्यावर होत्या. अखेर स्थानिक नागरिकांनी समजूत घातल्यानंतर जमाव पांगला. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.