कऱ्हाडात राजकीय आघाड्या टिकणार?, राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 11:15 AM2022-07-20T11:15:59+5:302022-07-20T11:16:47+5:30
वैचारिक बैठक वेगवेगळी असेल तर त्यांचे मैत्रीपर्व हे किती दिवस चालते हे सत्तानाट्यावरून स्पष्ट झाले आहेच.
प्रमोद सुकरे
कराड : राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. राज्यात राजकारणातून त्याचा अनुभव येत आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर हे सरकार पडण्यामागे अनैसर्गिक पद्धतीने झालेली महाविकास आघाडी हेच कारण दिले जात आहे, पण त्यामुळे आता कराड तालुक्यातील आघाड्या नैसर्गिक की अनैसर्गिक अन् त्याच्या भवितव्याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी केलेली आघाडी त्यांच्याच पक्षाच्या आमदारांना पचनी पडली नव्हती हे अडीच वर्षांनी बंडाच्या निमित्ताने समोर आले. वैचारिक बैठक वेगवेगळी असेल तर त्यांचे मैत्रीपर्व हे किती दिवस चालते हे सत्तानाट्यावरून स्पष्ट झाले आहेच. सोयीचे राजकारण आणि आघाड्या स्थानिक पातळीवरही होत राहतात. त्याचे भविष्यात काय होणार? याबाबतच्या चर्चा झाल्या नाहीत तर नवलच !
बाळासाहेब- उदयसिहांचं जिल्हा बँकेवरून बिघडलं
दिवंगत विलासराव पाटील व माजी आमदार पी. डी. पाटील या दोघांच्यात सुमारे ४० वर्षेे चांगले राजकीय संबंध राहिले. तीच परंपरा बाळासाहेब पाटील व उदयसिंह पाटील पुढे काही वर्षे चालवत होते. मात्र, विलासराव पाटील यांच्या निधनानंतर जिल्हा बँक निवडणुकीत उदयसिंह पाटील यांनी सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली. त्याविरोधात बाळासाहेबांनी दंड थोपटले आणि दोन गटात बिघडलं. या निवडणुकीत उदयसिंह पाटलांच्या पाठीशी काँग्रेस किती उभी राहिली? याबाबतही उलटसुलट चर्चा आहेत.
बाळासाहेब पाटील- अतुल भोसले आघाडी
बाळासाहेब पाटील व डॉ. अतुल भोसले या दोन गटांत जयवंत शुगरच्या उभारणीपासूनच सुप्त संघर्ष सुरू झाला होता. सन २००९ साली डॉ. भोसलेंनी राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवीत उत्तरेवर स्वारी केली. त्यामुळे आणखी बिघडले, पण नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या बाळासाहेब पाटील यांना भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. भोसले यांनी पाठिंबा देत त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला. डॉ. सुरेश भोसलेंनी तर यापुढे प्रत्येक निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांना आमची मदतच राहील, असे जाहीर करून टाकले आहे, पण राष्ट्रवादीच्या अविनाश मोहिते व भाजपच्या शेखर चरेगावकर, विक्रम पावसकर यांना ही बाब किती रुचली आहे हे कळायला थोडा वेळ जाईल एवढेच!
चव्हाण-उंडाळकर यांचं जुळलं !
कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण व विलासराव पाटील या दोन गटांत काँग्रेसअंतर्गत संघर्ष सुमारे ३५ वर्षे पाहिला आहे. २ वर्षांपूर्वी विलासराव पाटील व पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत जाहीर मेळाव्यातून या संघर्षाला पूर्णविराम देण्यात आला, पण दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांची मने आजही जुळलेली दिसत नाहीत आणि डॉ. इंद्रजित मोहिते यांना हे किती पचनी पडले आहे. हे सांगता येत नाही.
कार्यकर्त्यांचा सूर...
कराड पालिका निवडणूक पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब पाटील यांच्या गटांनी एकत्रित लढावी; तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक ही बाळासाहेब पाटील व उंडाळकर यांच्या गटाने एकत्रित लढावी; भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरती लढाव्यात अशा भावना इच्छुक उमेदवारांच्या आहेत, पण या भावना नेत्यांपर्यंत पोहोचणार का? पोहोचल्याच तर नेते दखल घेणार का? हे पाहण्यासाठी थोडे थांबावेच लागेल.
महाविकास आघाडी एकत्र लढणार का?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रित लढाव्यात, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे, तर उद्धव ठाकरे यांनीही तीच री ओढलेली आहे. अशा परिस्थितीत कराड तालुक्यातील निवडणुका कशा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.