मेढा : जावळी तालुक्यात मेढा नगरपंचायत झाल्याने जिल्हा परिषदेचे व पंचायत समितीचे गट, गण रद्द होतात की काय? याबाबत गट व गण कायम राहिल्याने राजकीय नेत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरीही गट व गणाची पुनर्रचना कशी होईल, याची राजकीय गणिते मांडण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यात तीन गट व सहा गण असून, सध्या जावळी पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे.तालुक्यात जिल्हा परिषदेच्या मेढा गटात मेढा व केळघर गण, कुडाळ गटात कुडाळ व आनेवाडी गण व हातगेघर गटात हातगेघर व म्हसवे हे गण आहेत. गेल्या निवडणुकीत मेढा गटातील केळघर गणात विद्यमान उपसभापती निर्मला कासुर्डे यांनी कुडाळ गटातील आनेवाडी गणात माजी सभापती सुहास गिरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. परंतु आज मात्र हे दोघेही सत्तेत आहेत. तर कुडाळ गटात शिंदे गटाला धक्का देत दीपक पवार यांनी बाजी मारली. या वस्तुस्थितीचा विचार केला तर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस जावळीत पुन्हा उभारी घेत असलेली शिवसेना, माजी आमदार सदाशिव सपकाळ व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली उभा राहण्याच्या प्रयत्नात असलेला भाजपा या साऱ्यांचीच या निवडणुकीत कसोटी लागणार असे सध्या तरी चित्र आहे.तालुक्यात विद्यमान सदस्य आपल्या गण, गटात उभे राहण्यासाठी इच्छुक आहेत. यामध्ये मेढा गटातून विद्यमान सदस्य अमित कदम तर कुडाळ गटातून दीपक पवार हे इच्छुक असल्याची चर्चा आहे. तर पंचायत समिती सदस्यही पुन्हा संधी मिळण्यासाठी प्रयत्नशील आहेत.तालुक्यात राष्ट्रवादीचे प्राबल्य असले तरीही शिवसेना, भाजपाच्या कडव्या आव्हानाला व अंतर्गत गटबाजीला आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीला जास्त ताकद लावावी लागणार असल्याची चर्चा आहे. मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना, भाजपा सक्रिय झाले आहेत. त्यातूच अमित कदम व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नगरपंचायतीच्या श्रेयवादावरून बिघडलेले संबंध कितपत सुधारलेत याबाबत पदाधिकारी व कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. कारण मेढा नगरपंचायतीच्या श्रेयवादावरून झालेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर हे दोघे कोठेच एकत्र आल्याचे दिसले नाही.त्यामुळे अंतर्गत धुसफूस असलेली राष्ट्रवादी काँग्रेस, शोधावी लागणारी राष्ट्रीय काँग्रेस, कणखर नेत्याविना मात्र जनतेच्या पाठिंब्यावर सुरू असलेली शिवसेनेची वाटचाल अन् माजी आमदार सदाशिव सपकाळ व जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांच्या नेतृत्वाखालील भाजप या साऱ्यांनाच ही निवडणूक आव्हानात्मक ठरणार असल्याचे चित्र आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेसाठी सर्व काही असेच धोरण राबवून बंडखोर उमेदवार सुहास गिरी व राष्ट्रीय काँग्रेसच्या निर्मला कासुर्डे यांना बरोबर घेऊन सत्तेची गणिते जुळवली. एवढेच नव्हे तर यांना पदेही दिली.यामुळे राष्ट्रवादीचे निष्ठावंत दुखावल्याची चर्चा आहे. त्यातच कुडाळ गटात दिवंगत लालसिंगराव शिंदे घराण्याच्या वारसदार असलेल्या सुनेत्राताई शिंदे व त्यांचे पुत्र सौरभ शिंदे यांची भूमिका अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे.तालुक्यातील १ लाख १ हजार ८२८ मतदार संख्या असून, यामध्ये अनुसूचित जातीचे ७०८४ व अनुसूचित जमातीचे १७४९ मतदार आहेत. एकंदरीत जावळीत गट व गणातील पुनर्रचनेच्या निश्चितीनंतर कोण कोठे उभे राहणार, कोणाचे प्राबल्य आहे हे जरी ठरणार असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा व शिवसेना, आरपीआय या साऱ्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची, अस्तित्वाची ठरणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. परंतु इच्छूक उमेदवारांची संख्या मात्र वाढली आहे. (प्रतिनिधी)
गट-गणाच्या पुनर्रचनेवर राजकीय गणिते
By admin | Published: August 26, 2016 12:32 AM