नसीर शिकलगार।लोकमत न्यूज नेटवर्कफलटण : फलटण तालुक्यातील २८ ग्रामपंचायत निवडणुकींचा बिगुल वाजला असून, काही ठिकाणी चुरशीच्या निवडणुका होत आहेत.थेट सरपंचपदाच्या निवडणुकीमुळे तालुक्यातील बरीचशीराजकीय समीकरणे बदलली जाणार आहेत. सध्या तालुक्यातील हालचाली गतिमान झाल्या आहेत.फलटण तालुक्यातील वेळोशी, उपळवे, तरडफ, सुरवडी, ताथवडा, सालपे, पिंपरद, मिरेवाडी, झडकबाईचीवाडी, मानेवाडी, वडले, जाधवनगर, चव्हाणवाडी,कुरवली बुद्रुक, विडणी,चौधरवाडी, सावंतवाडा, बरड, मठाचीवाडी, पाडेगाव, कुसूर,आदर्की बुद्रुक, आदर्की खुर्द, सोमंथळी, दुधेबावी, गिरवी,वाठार-निंबाळकर आदी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यासाठीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
त्यानुसार २२ ते २९ सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. दि. ३ आॅक्टोबर रोजी नामनिर्देशन अर्जाची छाननी होणार आहे. दि. ५ आॅक्टोबरपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा कालावधी आहे. तसेचयाच दिवशी निवडणूक चिन्ह देणे व निवडणूक लढविणाºया उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.१४ आॅक्टोबर रोजी मतदान होणार असून, दि. १६ रोजी मतमोजणीआहे.
दि. १७ आॅक्टोबरलानिवडणूक निकाल जाहीर केला जाणार आहे. राजकीयदृष्टीने गिरवी, दुधेबावी, वाठार-निंबाळकर, उपळवे, विडणी, बरड, ताथवडा, सुरवडी या ठिकाणची निवडणूक महत्त्वाची आहे. येथील ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी नेतेमंडळी प्रयत्नशील असणार आहेत. फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस यांच्यातच प्रामुख्याने सर्व निवडणुकामध्ये सामना होत असतो. राज्यात आणि केंद्रात भाजप सरकार असूनही फलटण तालुक्यात योग्य नेतृत्वाअभावी पक्षाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीलाही दोन्ही काँग्रेसमध्येच सामना रंगण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील ७ जिल्हा परिषद गटापैकी ६ गट सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर गिरवी गट फक्त राष्ट्रीय काँग्रेसकडे आहे. पंचायत समितीच्या १४ पैकी १२ गण राष्ट्रवादी तर २ काँग्रेसकडे आहेत. गिरवी गट आणि गिरवी गण काँग्रेसकडे असला तरीया गटातील गिरवी, वाठार-निंबाळकर, उपळवे, जाधवनगर वेळोशी, सावंतवाडा, तरडफ, ताथवडा, मानेवाडी या ग्रामपंचायत निवडणुकीत दोन्ही काँग्रेसचा कस खºया अर्थाने लागणार आहे.गिरवी गटातील ग्रामपंचायत निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.विडणीतील निवडणूक लक्षवेधी...तालुक्यातील विडणी हे गाव राजकीयदृष्ट्या मोठे असून, येथील निवडणूकही लक्षवेधी असणार आहे. यावेळी प्रथमच थेट सरपंच पदासाठी मतदान होत असल्याने नेतेमंडळींना सरपंचपदासाठी आणि सदस्य निवडणूक असे दोन्हीकडे लक्ष द्यावे लागणार आहे.