सातारा : बोगदा असो वा प्रतापसिंहनगर, या भागांची ‘ख्याती’ सातारकरांना पूर्वापार माहीत आहे. याव्यतिरिक्त शहरातील अनेक भाग गुंडगिरीसाठी पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. परंतु आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले असोत वा आमदार शशिकांत शिंदे, या नेत्यांनी अनुक्रमे बोगदा आणि प्रतापसिंहनगरमधील दहशत, गुंडगिरीबद्दल आवाज उठविण्यासाठी निवडणुकीनंतरचाच मुहूर्त का शोधला, या राजकीय गुंडांना मोठ्ठं कुणी केलं, यावर आता चर्चा रंगल्या आहेत. सा ता रा श ह रा त ए कू ण झो प ड्या 3, 0 0 0बोगदा परिसरात दहशत पसरविणाऱ्यांचा, अडवून लुटालूट करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना पोलिसांना देणार असल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नुकतेच पत्रकार परिषदेत सांगितले. पण इतकी वर्षे ही स्थिती दिसली कशी नाही, यासह अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. बोगदा परिसर खरे तर पूर्वीपेक्षा तुलनेने शांत आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. पूर्वी समर्थ मंदिर चौकातील दुकानदारांना सळो की पळो करून सोडले जात होते. हप्तेखोरीला उधाण आले होते. या परिसरात नवीन दुकाने थाटण्यास लोक धजावत नव्हते. सायंकाळी सातनंतर बोगद्यातून ये-जा करणे हे दिव्यच होते. एकट्या-दुकट्याला वाटेत गाठून लूटमार केली जात होती. ही सर्व परिस्थिती लोकप्रतिनिधींना माहीत नव्हती, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.बोगदा परिसरात घर बांधायला किंवा फ्लॅट घ्यायला पूर्वी कुणी धजावत नसे. परंतु आज येथे सुरू असलेली असंख्य बांधकामे येथे नागरी वस्ती वाढत असल्याची साक्ष देतात. अनेक स्वतंत्र बंगल्यांच्या वसाहती आणि अपार्टमेन्ट या भागात वाढल्या आहेत. त्यामुळे पूर्वीची या भागाची ओळख पुसली जाऊ लागली आहे.तसेच बोगदा ते यवतेश्वर रस्त्यालगत वाढत चाललेली झोपडपट्टी, झोपडीधारकांना मिळणारे वीजजोड, पाणीजोड हे सारे उघड गुपित आहे. वस्तुत: पॉवर हाउसची टेकडी हे पूर्वापार चालत आलेले गायरान आहे. त्यावर अतिक्रमणे होऊ नयेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांपासून सर्व अधिकाऱ्यांना वर्षानुवर्षे निवेदने दिली गेली आहेत. या झोपडपट्टीतील एका घरावर घाटातील वाहनातून मोठा ओंडका पडून एका चिमुकलीला प्राणही गमवावे लागले आहेत. तरीही वाढत्या अतिक्रमणांबद्दल कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. हद्दीच्या वादात झोपड्या वाढतच चालल्या आहेत. या पार्श्वभूमीमुळे बोगदा परिसर हा दहशत आणि गुन्हेगारीसाठी ओळखला जात आहे. वास्तविक, मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे लोक या भागात सर्वाधिक आहेत. परंतु विधानसभा निवडणुकीनंतर अशी काय माशी शिंकली, असा प्रश्न परिसरात विचारला जात आहे. (प्रतिनिधी)रेल्वे झोनवर झोपडीचा दर दीड लाखविकासनगराच्या बाजूलाच रेल्वे झोन आहे. ही जागा रेल्वेच्या मालकीची आहे. येथेच ‘झोपडपट्टी दादा’ने झोपड्या टाकून अतिक्रमण केले आहे. विशेष म्हणजे संबंधित दादा एक झोपडी काही दिवसांपूर्वी ७0 हजार रुपयांना देत होता. आता तर त्यांने एका झोपडीचा दर दीड ते दोन लाखांवर नेला आहे.आमदार शिंदे यांचा आणि त्यांच्या बंधूंचा फोटो असलेला फलक प्रतापसिंहनगर परिसरात अनेकांनी अनेक वर्षे पाहिला आहे. त्यावेळी गुंडगिरीचे खापर पोलिसांवर का फोडले नाही, असाही सवाल उपस्थित झाला आहे. डबेवाडी ते बोगदा रस्त्यावर मध्यंतरी झालेल्या खुनाच्या घटनेत आणि एका बांधकाम व्यावसायिकाशी स्थानिकांच्या झालेल्या वादावादीत याचे मूळ आहे. ही घटना ‘खंडणी’च्या स्वरूपात पुढे आली असली, तरी पोलिसांत तक्रार नाही. या घटनांचा थेट परिणाम निवडणुकीतील मतदानावर झाल्याचे परिसरात सांगितले जाते. त्यामुळेच आमदार शिवेंद्रसिंहराजेंना या परिसरातील गुंडगिरी, गुन्हेगारीविषयी बोलणे क्रमप्राप्त झाले, अशी माहिती काही स्थानिकांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिली.
राजकीय गुंडांचा भस्मासुर जाहला !
By admin | Published: October 28, 2014 11:24 PM