सातारा : गाडी अडविल्याच्या कारणावरून एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याने महिला वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालून उद्दाम वर्तन केले. तसेच वाहन न थांबविता संबंधित पदाधिकारी निघून गेल्याने पुढील चौकात गाडी थांबविण्यात आली. तथापि, रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात गुन्हा दाखल झाला नव्हता. एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याने वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्यामुळे वाहतूक विभागाच्या महिला पोलिसाने त्याची कार पोवई नाक्यावर रोखली. पोलिसाने लायसेन्स मागताच महाशयांनी पक्षाचे ओळखपत्र पुढे केले. ‘मी ओळखपत्र नव्हे; लायसेन्स मागितले आहे,’ असे महिला पोलिसाने म्हणताच पदाधिकाऱ्याने वाद घालण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे, तर गाडीत बसून गाडी सुरूही केली आणि तेथून महाशय निघूनही गेले. दरम्यान, महिला पोलिसाने बसस्थानक चौकातील कर्मचाऱ्यास सतर्क करून ही गाडी थांबविण्यास सांगितले. तेथेही या पदाधिकाऱ्याने शिवीगाळ व दमदाटी केली. पोवई नाक्यावरील महिला कर्मचारी तोपर्यंत बसस्थानक चौकात पोहोचली होती. कर्मचाऱ्यांनी गाडी ताब्यात घेऊन वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणली आणि या महाशयांवर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची तयारी सुरू केली. मात्र, यासंदर्भात गुन्हा रात्री उशिरापर्यंत दाखल झाला नव्हता. (प्रतिनिधी)
महिला पोलिसासमोर राजकीय मुजोरी
By admin | Published: January 13, 2016 10:53 PM