सांगली : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था गटातील विधानपरिषद निवडणुकीसाठी शनिवारी (१९ नोव्हेंबर) सांगली आणि सातारा जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. विधानपरिषदेसाठी १९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २२ नोव्हेंबरला मतमोजणी आहे. दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी चार मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान करता येणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रत्येक केंद्रावर दोन मतपेट्या, याप्रमाणे एकूण १६ मतपेट्या ठेवण्यात येणार आहेत. मतपेट्यांसह अन्य साहित्याचे वाटप शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) सांगलीतील निवडणूक कार्यालयातून करण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी प्रत्येक केंद्रावर पाच, याप्रमाणे ४0 कर्मचाऱ्यांची, तर प्रत्येक केंद्रासाठी दोन याप्रमाणे १६ पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व केंद्रांवर चित्रीकरण सोयही केली आहे. साहित्य वाटप करताना प्रशिक्षणही दिले जाणार आहे. (प्रतिनिधी) रिंगणातील उमेदवार... मोहनराव कदम (काँग्रेस) शेखर गोरे (राष्ट्रवादी) शेखर माने (अपक्ष) मोहनराव गुलाबराव कदम (अपक्ष) साताऱ्यात सर्वाधिक मतदान विधानपरिषदेसाठी एकूण ५७0 मतदान असून, महिला मतदार २८४, तर २८६ पुरुष मतदार आहेत. सांगली जिल्ह्यातील सदस्यसंख्या २७४, तर सातारा जिल्ह्यातील सदस्यसंख्या २९६ आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यांना मतदान केंद्रे ठरवून दिली आहेत. निवडणुकीसाठी एकूण १८ स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य, पदाधिकारी मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
विधानपरिषदेसाठी उद्या मतदान
By admin | Published: November 18, 2016 12:05 AM