सातारा : जिल्ह्यातील निम्म्याहून जास्त ग्रामपंचायतींची निवडणूकप्रक्रिया सुरू आहे. गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार राजकीय घडामोडी घडल्या. आता शुक्रवारी ग्रामपंचायतीसाठी उभ्या असलेल्या ९ हजार ५२१ उमेदवारांचे भविष्य मशीनबंद होणार असून यातून ४ हजार ६३५ सदस्य निवडले जाणार आहेत.
गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झालेल्या गावांत प्रचार मोहिमा सुरू होत्या. गावांतील चौकाचौकांत उमेदवारांचे बॅनर लागले होते. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीदेखील झडल्या. आता मतदारांच्या हातात अधिकार आले आहेत. गावचा सामूहिक विकास करण्यासाठी योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी मतदार हाती असलेल्या शस्त्राचा वापर करणार आहेत. शुक्रवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदानप्रक्रिया राबविली जाणार आहे. मतदान केलेल्या मशिन्स तालुक्याच्या ठिकाणी स्ट्राँग रुममध्ये ठेवल्या जाणार आहेत तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
संवेदनशील गावे
जिल्ह्यातील निवडणूक लागलेल्या काले, सुर्ली, उंडाळे, शेणोली, कोळे, पाल, वाघेरी, शिरवडे, नावडी, कोडोली, अंगापूर, शेंद्रे, बोरगाव, वाढे, तारगाव, देऊर, बावधन, उडतारे, देगाव, विरमाडे, खानापूर, गुळुंब, भादे, अतिट, तांबवे, काळज, महिगाव, सरताळे, सर्जापूर, निझरे, निमसोड आदी गावे संवेदनशील आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानावेळी योग्य सामाजिक अंतर, मास्कचा वापर तसेच सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे.
मतदानावेळी मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, वाहन परवाना, पॅनकार्ड, आस्थापनेचे ओळखपत्र, शासकीय ओळखपत्र यापैकी एक कागदपत्र जवळ असणे आवश्यक आहे.
१८ जानेवारीला निकाल लागणार
१५ जानेवारी रोजी मतदानप्रक्रिया पार पडेल. त्यानंतर ईव्हीएम मशीन तालुक्यातील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात येणार असून १८ जानेवारी रोजी मतमोजणी होईल.
प्रशासनाकडून दक्षता
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना केलेल्या आहेत. निवडणुकीत अनुचित प्रकार घडल्यास जागच्या जागी कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. गैरप्रकारावरदेखील प्रशासनाचे लक्ष आहे.
- शेखर सिंह, जिल्हाधिकारी
पोलीस बंदोबस्त
जिल्ह्यात एकूण २०३८ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर २ हजार ३८ पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहेत. स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारीदेखील सज्ज आहेत. गाेंधळाच्या ठिकाणी कृती दल पाठविण्याची व्यवस्थादेखील पोलीस दलाच्या वतीने करण्यात आलेली आहे. राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी जिल्ह्यात दाखल झाली आहे.