सातारा : जिल्ह्यातील ८७८ पैकी ६५२ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान प्रक्रिया होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले असून २ हजार ३८ मतदान केंद्रांवर तयारी सुरु करण्यात आली आहे. १९ हजार ४३७ कर्मचारी मतदान केंद्रांवर गुरुवारी रवाना झाले. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या ९ हजार ५२१ उमेदवारांचे भविष्य मशिनबंद होणार आहे.जिल्ह्यातील २२३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर ३ ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्जच दाखल झालेले नाहीत. उर्वरित ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. बुधवारी जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.मतदानासाठी २ हजार ३८ पोलीस नेमण्यात आले आहेत. महसूल अधिकाºयांच्या नियंत्रणाखाली भरारी पथकेही तयार करण्यात आली आहेत. निवडणुकीसाठी नेमणूक केलेले १९ हजार ४६७ कर्मचारी साहित्य घेऊन गुरुवारी निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींकडे रवाना होणार आहेत. मतदान केंद्रावर गेलेले कर्मचारी निवडणूक आयोगाला अहवाल पाठवतील. त्यानंतर निवडणूक मतदानादिवशी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या समोर मॉकपोल घेतला जाईल. त्यानंतरच निवडणूक मतदान सुरु होईल.
- मतदान केंद्रांची संख्या : २0३८
- निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची संख्या : ४0१
- सहायक निवडणूक निर्णय अधिकारी : ५९८
- क्षेत्रीय अधिकारी : १२४
- मतदान केंद्राध्यक्ष : २0३८
- मतदान कर्मचारी : ६0१४
- शिपाई : २0३८
- पोलीस कर्मचारी : २0३८
- आशा अंगणवाडी सेविका : २३२२
- एकूण : १९ हजार ४६७