सांगली : सांगली-सातारा जिल्ह्यांच्या राजकीय वर्तुळात बहुचर्चित ठरलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान होत आहे. दोन्ही जिल्ह्यातील आठ ठिकाणी मतदान केंद्रे उभारण्यात आली असून, ५७० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी चार उमेदवार रिंगणात असले तरी काँग्रेसचे मोहनराव कदम व राष्ट्रवादीचे शेखर गोरे यांच्यात मुख्य लढत होत आहे. मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था गटातील विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे. ५७० मतदारांमध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, महापालिकेचे नगरसेवक व नगरपालिकेच्या नगरसेवकांचा समावेश आहे. सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृह, विटा, जत येथील तहसील कार्यालय आणि इस्लामपूरचे प्रांताधिकारी कार्यालय या चार केंद्रांवर, तर सातारा जिल्ह्यात सातारा, वाई, फलटण व कऱ्हाड तहसील कार्यालय अशी चार केंद्रे आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांवर दोन मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक केंद्रावर पाच प्रमाणे ४० कर्मचाऱ्यांची व १६ पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. आठ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर मतदान प्रक्रियेवर असेल. मतमोजणी २२ रोजी सांगली येथील शासकीय विश्रामगृहाशेजारील महसूल भवनमध्ये होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसचे मोहनराव कदम, राष्ट्रवादीचे शेखर गोरे, काँग्रेसचे बंडखोर शेखर माने व अपक्ष उमेदवार मोहनराव गुलाबराव कदम असे चार उमेदवार रिंगणात आहे. मात्र काँग्रेसचे कदम व राष्ट्रवादीचे गोरे यांच्यात थेट लढत होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून एकमेकांचे नगरसेवक फोडण्यावर दोन्ही पक्षांनी भर दिला होता. त्यात भाजपचा उमेदवार रिंगणात नसल्याने या पक्षाच्या नगरसेवकांना खेचण्यासाठी विशेष प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. काँग्रेसमध्ये विशाल पाटील गटाच्या बंडखोरीमुळे शेवटच्या क्षणापर्यंत अस्वस्थता पसरली आहे. पाटील यांनी मोहनराव कदम यांना पाठिंबा दिला असला तरी त्यांचे उमेदवार शेखर माने यांनी मात्र रिंगणातून माघार घेतलेली नाही. या गटाच्या नगरसेवकांचा रात्री उशिरा निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही पक्षांनी संभाव्य फाटाफूट टाळण्यासाठी कसोशीने प्रयत्न चालविले आहेत. फाटाफुटीची शक्यता असल्याने शनिवारी तणावाच्या स्थितीत मतदान होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांनी आपापल्या समर्थक मतदारांना जिल्'ाबाहेर हलविले आहे. शनिवारी सकाळी थेट मतदान केंद्रांवर त्यांना आणले जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे महाबळेश्वरला, तर काँग्रेसचे मतदार कोल्हापुरात काँग्रेस, राष्ट्रवादीसह अपक्ष उमेदवारांनी मतदारांना सहलीवर पाठविले होते. हे सर्व नगरसेवक आता जिल्'ाच्या सीमेवर परतले आहेत. कोल्हापूर येथील पंचतारांकित हॉटेलवर काँग्रेसच्या मतदारांना नेत्यांच्या नजरकैदेत ठेवण्यात आले आहेत, तर राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या मतदारांना महाबळेश्वर येथे नेले आहे. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये खलबते सुरू होती. अपक्ष शेखर माने यांच्या गटाचे मतदारही सायंकाळी अज्ञातस्थळी रवाना झाले. दोन मोहनराव, दोन शेखर विधानपरिषदेच्या रिंगणात दोन मोहनराव, तर दोन शेखर असे चौघेजण आहेत. काँग्रेसच्या मोहनराव कदम यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या मोहनराव गुलाबराव कदम यांना राष्ट्रवादीने मतविभागणीसाठी मैदानात उतरविले आहे. त्यातच राष्ट्रवादीचे शेखर गोरे व विशाल पाटील गटाचे शेखर माने असे दोन शेखर मैदानात आहेत. विशाल पाटील यांनी काँग्रेसचे मोहनराव कदम यांना पाठिंबा जाहीर केला आहे, पण शेखर माने यांनी मात्र शेवटपर्यंत पाठिंब्याची भूमिका जाहीर केलेली नाही. त्यात याच गटातील स्वाभिमानी आघाडीची भूमिकाही स्पष्ट झालेली नसून त्याचा फायदा-तोटा कोणाला होणार, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. चौकट अफवांवर विश्वास ठेवू नका : गायकवाड जिल्हा प्रशासनाने मतदानासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण केली आहे. मतदान कर्मचाऱ्यांना साहित्याचे वाटप केले आहे. मतमोजणीबाबत काही अफवा पसरविल्या जात आहेत. मतदान प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय आहे. सर्व मते मिसळून मतमोजणी होणार आहे. त्यामुळे संस्था अथवा व्यक्तिनिहाय मतदान कोणालाही कळणार नाही. मतदारांनी कोणत्याही अफवा अथवा चर्चेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शेखर गायकवाड यांनी केले आहे.
सांगली-सातारा विधानपरिषदेसाठी आज मतदान
By admin | Published: November 18, 2016 11:21 PM