महाबळेश्वर : ध्वनी प्रदूषण करून पर्यटनस्थळाची शांतता भंग केल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाबळेश्वरात शनिवारी मोठी कारवाई केली. येथील ‘हॉटेल किज’ला सील करून हॉटेलचा वीज व पाणी पुरवठा खंडित केला. नाताळ अन् ३१ डिंसेबरच्या तोंडावर कारवाई केल्याने हॉटेल व्यावसायिकामध्ये खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्राचे नंदनवन, थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर जगभर प्रसिद्ध आहे. वाढते वायूप्रदूषण, धकाधकीच्या जीवनाला कंटाळेले पर्यटक चार दिवस शांतता मिळविण्यासाठी महाबळेश्वरात येतात. शहरापेक्षा शहरालगतच्या जंगलसदृश्य विभागात राहण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे शहरापेक्षा लगतच्या परिसरात हॉटेल व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. शहरापासून थोडे दूर असल्याने हॉटेलमध्ये कोणाचा कसलाच अडथळा येत नाही.
शांत व निवांत वातावरणात लग्न सोहळे व विविध खासगी कंपन्यांचे परिषदा होतात. या मंडळींच्या मनोरंजनासाठी रात्री करमणुकीचे कार्यक्रम होतात. यासाठी हॉटेलच्या लॉनवर व्यासपीठ उभारून कर्णकर्कश आवाजात कार्यक्रम पार पडतात. दारू पिऊन रात्रभर धिंगाणा सुरू असतो. रात्री दहानंतर ध्वनीक्षेपकांवर बंदी आहे. याचे भानही या मंडळींना नसते. गावच्या पर्यटनावर परिणाम होईल म्हणून येथील स्थानिक नागरिक निमूटपणे सहन असतात. काहीवेळा तक्रार करूनही कोणी दखल घेत नाही त्यामुळे अनेक वर्षे येथे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषणाचा त्रास येथील जनता सहन करीत आहे. परंतु यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा चांगलाच बडगा उगारला आहे.विधानसभेत घुमला आवाजयेथील हॉटेल किजमध्ये लग्न सोहळ्यानिमित्त आयोजित करमणुकीच्या कार्यक्रमासाठी रात्री उशिरापर्यंत ध्वनीक्षेपक सुरू होते. यासंदर्भात अनेकांनी पोलिस ठाण्यात तक्रारी केल्या; परंतु पोलिसांकडून दुर्लक्ष झाले. रात्री दोन वाजता कार्यक्रम संपल्यानंतर ध्वनीक्षेपक बंद झाला. याप्रकाराने चिडलेल्या काही नागरिकांनी पालकमंत्री व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडे तक्रारी केल्या. दरम्यान, या तक्रारीबाबत विधान परीषदेत हा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा ‘ध्वनीप्रदूषण करणाºया अशा हॉटेलवर कारवाई करण्यात येईल,’ असे आश्वासन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले. त्यानंतर वेगाने सूत्रे हलण्यास सुरुवात झाली. रामदास कदम यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सातारा कार्यालयाचे प्रमुखांना थेट कारवाई करण्याचे आदेश दिले.कारमध्येही गाणी लावून पर्यटकांचा गोंधळमहाबळेश्वर हा जंगली भाग आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजविण्यास परवानगी नसते. तरीही काही हौशी पर्यटक महाबळेश्वर परिसरातील रस्त्याच्या कडेला आपापल्या गाड्या उभ्या करून त्यामध्ये मोठ्या आवाजात गाणी लावून नाचत असतात. मोठ्या आवाजामुळे आजूबाजूच्या स्थानिक रहिवाशांना याचा त्रास होतोच. शिवाय जंगलातील वन्य प्राण्यांच्या हालचालीवरही परिणाम होतो. त्यामुळे बिथरलेले प्राणी पर्यटकांवर हल्ला करू शकतात, याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.