सातारा, दि. १६ : दिवाळी उत्सवात फटाक्यांची आतषबाजी करून हवेचे व ध्वनीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. याबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य शासनाने प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील २ हजार ७१३ जिल्हा परिषद शाळेतील १ लाख ४७ हजार ९१९ विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.
दिवाळी उत्सवात फटाक्यांची आतषबाजी करून हवेचे व ध्वनीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या व्यापक जनजागृतीमुळे फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी झाले असले तरीही याबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने हे अभियान सर्व जिल्हा परिषद शाळेत राबविण्यात आले.
शासनाच्या आदेशानुसार राज्यात सर्वच जिल्हा परिषद शाळांमध्ये हे अभियान राबविण्याविषयीचा अद्यादेश काढण्यात आला होता. त्यानुसार दीड लाख विद्यार्थी आणि शिक्षकांनी प्रार्थनेच्यावेळी ही शपथ घेतली.अशी घेतली शपथ ...
- सर्वसामान्य नागरिकांना निरोगी व प्रदूषणमुक्त वातावरणात जगण्यासाठी कुठेही पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ
- पर्यावरणाचा समतोल राखू.
- दैनंदिन जीवनात ज्या प्लास्टिीकमुळे प्रदूषण होते त्याचा वापर करणे आम्ही टाळू.
- आम्ही असा संकल्प करतो की, समृद्ध पर्यावरणाच्या रक्षणासाठी आमच्या वाढदिवसाला किमान एक झाड लावू व त्याचे नित्यनियमाने संगोपन करू.
राज्य शासनाच्या आदेशानुसार प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियानातंर्गत जिल्हा परिषदेच्या सर्व विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. दिवाळीच्या सुटीत यावर अंमल करण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षकांनी प्रबोधनही केले आहे.पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी,जिल्हा परिषद, सातारा