जयदीप जाधव ।रहिमतपूर : महाराष्ट्रातील पहिला तलाव जोड प्रकल्प कोरेगाव तालुक्यातील वेळू येथे सुरू आहे. तीन तलाव जोडणीचे काम पूर्ण झाले असल्याने तिन्ही तलाव ९० टक्के भरले असून, उर्वरित दोन तलाव जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तलाव पाण्याने फुल्ल भरल्यामुळे ओढे, नाले खळाळू लागले असून, विहिरींच्या पाणी पातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे बहुचर्चित तलाव जोड प्रकल्पाचा करिश्मा वेळूत पाहावयास मिळत आहे.
वेळू या गावाला गेल्या तीन वर्षांपूर्वी ऐन उन्हाळ्यात डिसेंबर ते जून महिन्यांत पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. या कालावधीत टँकरने पाणीपुरवठा होत होता. सुमारे दोन हजार लोकसंख्या असलेले गाव पाणीप्रश्न कायमचा सोडविण्यासाठी पेटून उठले. अभिनेता आमिर खानच्या पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन पावसाचे पाणी साठवणे व मुरवण्याचे मोठ्या प्रमाणात काम केले. यामुळे वॉटर कप स्पर्धेत वेळूचा महाराष्ट्रात पहिला क्रमांक आला. या बरोबरच राज्य शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाचे विविध प्रकल्प राबवले. जलयुक्त अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पाबरोबर तलाव जोड प्रकल्पालाही सुरुवात केली.
वेळू-बेलेवाडी गावाच्या वरती तलाव नंबर एक हा जुना पाझर तलाव आहे. पावसाळ्यामध्ये पूर्णक्षमतेने भरल्यानंतर या तलावातून वाहून जाणारे पाणी वाया जात होते. तलाव जोड प्रकल्पामुळे त्या तलावातून वाया जाणारे पाणी इतर चार तलावांमध्ये सोडण्यास सुरुवात झाली आहे. पाचपैकी तीन तलावांची मुख्य लाईनची जोडणी पूर्ण झाली आहे. मुख्य लाईनपासून तलावापर्यंत चरी काढून पाणी पोहोचविलेले आहे. तलाव नंबर एक शंभर टक्के भरून पाणी वाहू लागले आहे. हे पाणी सायफन पद्धतीने इतर दोन तलावांमध्ये सोडले जात असून, ते दोन्ही तलाव ९० टक्के भरलेले आहेत. उर्वरित दोन तलावांची जोडणी पावसामुळे धिम्या गतीने सुरू आहे. लवकरच दोन तलावांच्या जोडणीचे काम पूर्णत्वास जाईल, असा विश्वास सरपंच लक्ष्मीबाई भोसले यांनी व्यक्त केला.सायफन पद्धतीमुळे वाढीव खर्चाला आळा...वेळू येथील पाच पाझर तलावांची २८५ टीसीएम पाणीसाठा निर्मिती क्षमता असून, २१० हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येणार आहे. पाचही पाझर तलावापर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी सायफन पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी वाहून नेण्यासाठी भविष्यातही वाढीव निधीची गरज राहणार नाही. पाणी वाहून नेण्यासाठी सायफन पद्धत ही उत्तम व फायदेशीर पद्धत आहे.
वेळू येथील तीन तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे निश्चितपणे शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. उर्वरित तलाव जोडणीचे काम हे अंतिम टप्प्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ यांच्या सहकार्यामुळे खासदार अनू आगा यांनी तलाव जोड प्रकल्पाला विशेषबाब म्हणून निधी उपलब्ध करून दिला. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषद व कृषी विभागाचेही सहकार्य मिळत आहे. महत्त्वपूर्ण तलाव जोड प्रकल्पासाठी ग्रामस्थांची व प्रशासनाची साथ मोलाची ठरली आहे.- लक्ष्मीबाई भोसले, सरपंच