पावसाची उघडझाप
कऱ्हाड : शहरासह तालुक्यात गत दोन दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू आहे. रात्रंदिवस ढगाळ वातावरण राहत असून, अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. या पावसामुळे पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, पोषक वातावरणासाठी मोठ्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
अस्ताव्यस्त पार्किंग
कऱ्हाड : शहरातील जुन्या कोयना पुलापासून वारूंजी फाट्याकडे जाणाऱ्या मार्गावर सह्याद्री हॉस्पिटल परिसरात अस्ताव्यस्त पार्किंग केले जात आहे. चारचाकी वाहनधारक रस्त्यावरच वाहने पार्क करीत आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत असून, रस्त्यात वाहने पार्क करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.
बॅरिगेड्स जैसे थे
कऱ्हाड : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड शहर पोलिसांनी मुख्य मार्गावर बॅरिगेड्स लावले आहेत. सध्या अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू आहेत. मात्र, तरीही पोलिसांनी बॅरिगेड्स उभे करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला आहे. त्यामुळे वाहनधारकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. बॅरिगेड्स हटविण्याची मागणी केली जात आहे.