कृष्णा कॅनॉलपासून ओगलेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यात सातत्याने मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. त्यामुळे अण्णा नांगरे नगरमधील काही घरात पाणी शिरते. तसेच रस्त्यावर आणि आजूबाजूला असलेल्या शेतातही मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते. या मार्गावरील एक लेन सध्या कामासाठी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ओगलेवाडी बाजूकडून कऱ्हाडच्या दिशेने येणाऱ्या लेनवर वाहतूक सुरू आहे. या लेनवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे, हेच समजत नाही. पावसाळा असल्याने किमान खड्डे मुरूम टाकून भरून घेणे गरजेचे आहे. मात्र, बांधकाम विभागासह तालुका प्रशासनाचे या रस्त्यावरील धोकादायक परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याने संताप व्यक्त होत आहे. बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
ओगलेवाडी रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 4:43 AM