वाई : वाई-पाचगणी मार्गावर असलेल्या पसरणी घाटातील संरक्षक कठड्यांची ठिकठिकाणी पडझड झाली आहे. काही ठिकाणचे कठडे केवळ नावापुरतेच उरले आहेत. वाहतुकीसाठी हा घाट प्रशस्त असला, तरी बांधकाम विभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना न केल्याने हा घाटमार्ग वाहतुकीसाठी धोकादायक ठरू लागला आहे. पावसाने उघडीप देताच बांधकाम विभागाने कठड्यांची दुरुस्ती करून धोकादायक वळणांवर रिफ्लेक्टर बसवावेत, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी
सातारा : शहरातील अंतर्गत रस्त्यांची खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पालिकेने काही रस्त्यांचे खडी व मुरून टाकून पॅचिंग केले होते; परंतु पावसामुळे काही दिवसांतच या रस्त्यांची अवस्था पुन्हा जैसे थे झाली. शहरातील बोगदा ते राजवाडा, राधिका चौक ते कोटेश्वर मंदिर, मंगळवार तळे मार्ग, यादोगोपाळ पेठ, बुधवार नाका ते मोळाचा ओढा या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. दहा दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यापूर्वी पालिकेने शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची डागडुजी करणे गरजेचे आहे. वाहनधारकांना होणारी परवड थांबविण्यासाठी पालिकेने रस्ते दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
पालेभाज्यांचे दर पुन्हा कडाडले
सातारा : गणेशोत्सवास सुरुवात झाल्यापासून साताऱ्यातील बाजारपेठेत पालेभाज्यांच्या दरात अचानक वाढ झाली आहे. या दरवाढीचा ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. वांगी, बटाटा, कोबी, फ्लॉवर यांसह सर्वच पालेभाज्यांचे दर ४० ते ६० रुपये किलोवर आले आहेत. टोमॅटो, मेथी, कोथिंबिरीचे दरही काही प्रमाणात वाढले आहेत. एकीकडे गॅस सिलिंडरचे दर सातत्याने वाढत असताना ग्राहकांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे; तर दुसरीकडे पालेभाज्यांचे दरही वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.