कऱ्हाड : कऱ्हाड - मसूर मार्गावरील रस्त्याकडेला असलेल्या साईडपट्ट्या ठिकठिकाणी खचल्या आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत. खचलेल्या साईडपट्ट्यांवरून दुचाकी वाहने जात असताना वाहन चालकाचा तोल जाऊन अपघात होत आहेत. रस्त्याच्या साईडपट्ट्या भरण्याची मागणी प्रवाशांसह वाहनधारकांतून केली जात आहे.
वेलींचा विळखा
कऱ्हाड : शहरातील मार्केट यार्ड परिसरातील खांबांना झाडवेलींनी विळखा घातला आहे. शहरातील भेदा चौक, कोल्हापूर नाका, पाटणकर कॉलनी परिसरात वीजवितरणच्या खांबांना झाडवेलींचा विळखा पडला आहे. या झाडवेलींना हटवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी
मसूर : पिंपरी ते रिसवड रस्त्याची दुरवस्था झाली असून सदरचा रस्ता गेले अनेक वर्षे दुरुस्ती केली नसल्याने दुरवस्थेत आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. संबंधित रस्ता हा शामगाव घाटातून खाली येऊन कऱ्हाडला राष्ट्रीय महामार्गाला जाण्यासाठी सोयीचा मार्ग म्हणून बनवण्यात आला होता. मात्र, हा रस्ता उखडल्याने या मार्गावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे.
गटारमुळे दुर्गंधी
कऱ्हाड : शहरातील मंडई परिसरात असलेली गटारे सातत्याने तुंबलेल्या अवस्थेत असून, त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. भाजीपाला विक्रेते शिल्लक राहिलेला भाजीपाला, तसेच कचरा गटारांमध्ये टाकत असल्याने तो कुजून दुर्गंधी पसरत आहे. परिणामी, तेथील रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत पालिकेने योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे.