सातारा : रायगाव, ता. जावळी येथील छाबडा मिलिटरी स्कूलमधील कोरोना केअर सेंटरमध्ये रुग्णांना बेचव जेवण दिले जात असल्याची तक्रार येथील रुग्णांनी तहसीलदार व केंद्र चालकांकडे केली आहे.
या सेंटरमध्ये ७० रुग्ण आहेत. जावळी तालुक्यातील रायगाव, आनेवाडी, सायगाव, महिगाव या भागातील कोरोनाग्रस्त रुग्णांना या ठिकाणी दाखल करण्यात येते. सुरुवातीच्या काळात चांगले जेवण मिळाले. परंतु काही महिन्यापासून बेचव आणि निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे. ताटात दिलेल्या चपात्या कडवट असतात, भाजीत मीठ, हळद नसते, केवळ लसणात परतून भाजी दिली जाते. मांसाहार तर दिलाच जात नाही.
हा प्रकार होत असल्याने सायगाव ग्रामपंचायतीचे सदस्य स्वप्निल डोंबे यांनी निवेदन तयार करून त्यावर केंद्रातील सर्व रुग्णांच्या सह्या घेतल्या, त्याबाबतचे निवेदन तहसीलदार व केंद्र चालकांना दिले असल्याचे डोंबे यांनी सांगितले. जेवणाच्या गुणवत्तेत सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.
फोटो ओळ : रायगाव येथील कोरोना सेंटरमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याची तक्रार आहे.
फोटो नेम : २३ रायगाव