नागठाणे : ‘देशाला महासत्ता बनविण्यासाठी लोकसंख्यावाढ नियंत्रित ठेवणे गरजेचे असून, ती देशातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे’, असे उद्गार सातारा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे अर्थशास्र विभागाचे प्रा. डाॅ. आर. एम. घाडगे यांनी काढले.
आर्टस अँड काॅमर्स काॅलेज, नागठाणे या महाविद्यालयात अर्थशास्त्र व भूगोल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसंख्या पर्यावरण आणि विकास’ या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
घाडगे म्हणाले, ‘लोकसंख्यावाढ ही देशातील गंभीर समस्या असून, लोकसंख्यावाढीमुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजाही पूर्ण होत नाहीत. तसेच पर्यावरण आणि लोकसंख्या यांच्यात संतुलन साधण्यासाठी शाश्वत विकासाची गरज आहे.’
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ. जे. एस. पाटील आपल्या भाषणात म्हणाले, ‘लोकसंख्यावाढ व सामाजिक, आर्थिक व धार्मिक असमानतेमुळे देशात गरीब आणि श्रीमंत ही दरी अधिकच वाढत आहे. त्यामुळे हा समतोल साधण्याची समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. तसेच लोकसंख्यावाढ व सामाजिक विषमता याविषयी संत महात्म्यांनी प्राचीन काळीच भविष्यकालीन स्थितीचे वर्णन केलेले असून, तत्कालीन समाजाला निश्चितच प्रेरणादायी आणि आदर्शवत आहे.’
कार्यक्रमाचे अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. आर. एम. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. जयमाला उथळे यांनी सूत्रसंचालन केले. भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. दीपक गुरव यांनी आभार मानले. हा कार्यक्रम झूम ॲपच्या माध्यमातून संपन्न झाला. कार्यक्रमास इतर महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ऑनलाईन सहभाग नोंदविला. तांत्रिक साहाय्य प्रा. एन. एम. चोबे यांनी केले.