चाफळ : चाफळ विभागातील उत्तरमांड धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत उत्तरमांड धरणाअंतर्गत बाधित प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसना संदर्भातील प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत प्रलंबित खातेदारांना भूखंड व जमिनी वाटप करणे, प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या जमिनीतील अडथळे दूर करणे, गावठाणातील नागरी सुविधा अपूर्ण कामे, उदरनिर्वाह भत्ता वाटप करणे, येथील विशेष बाब प्रस्तावाबाबत कारवाई करणे तसेच जाळगेवाडी येथील खातेदारांचा प्रलंबित ऐच्छिक प्रस्ताव मार्गी लावणे आदींबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
बैठकीस गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी कीर्ती नलवडे, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हिरे, शाखा अभियंता जोशी, तहसीलदार योगेश टोमपे, भरत साळुंखे, शिवाजी बोंगाणे, शिवाजी काटे, उत्तम माथणे, वसंत भोसले, सुरेश चव्हाण, यशवंत पाटील, उत्तम पाटील व उत्तरमांड प्रकल्पग्रस्तांची उपस्थिती होती.