जगदीश कोष्टी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : रक्ताला पर्याय नाही, त्यातून ‘आरएच निगेटिव्ह’ असेल तर लांब-लांबपर्यंत शोध घ्यावा लागतो. साताºयात मात्र रविवारी ‘निगेटिव्ह’ रक्ताची ‘पॉझिटिव्ह’ कहाणी अनुभवास मिळाली. जिल्हा रुग्णालयातील चार रुग्णांना ‘ओ निगेटिव्ह’ रक्ताची गरज होती. जिल्ह्यातील रक्तपेढ्यातून काही प्रमाणांत उपलब्ध झाले. पण आणखी बारा बाटल्या हव्या होत्या. व्हॉट्स अॅप ग्रुपवर आवाहन केले अन् काही तासांत नऊ रक्तदाते धावून आले.क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात कायमच युद्धाचा प्रसंग असतो. कधी कोणता रुग्ण दाखल होईल, याचा नेम नाही. रुग्ण दाखल झाला की कर्मचारी, अधिकाºयांची धावपळ सुरू होते. रविवारीही अशीच परिस्थिती उद्भवली.जिल्हा रुग्णालयात सकाळपासून सायंकाळपर्यंत चार रुग्ण दाखल झाले. योगायोग म्हणजे सर्वांचेच रक्तगट ‘ओ निगेटिव्ह’ होते. त्यांना रक्त उपलब्ध करून देणे गरजेचे होते. ‘ओ निगेटिव्ह’चे रक्तदाते शंभरात दोन ते तीन आढळतात. त्यामुळे त्यांना ‘अति दुर्मीळ रक्तगट’ म्हणूनही ओळखले जाते.रक्तसुरक्षा विभाग जिल्हा एड्स नियंत्रण विभागाकडून व्यवस्थापन केले जाते. त्यांनी जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमधून उपलब्ध करून दिले. परंतु या रुग्णांना आगामी काही दिवसांमध्ये रक्त द्यावे लागणार होते. त्यामुळे किमान बारा बाटल्या उपलब्ध करण्याचे आव्हान प्रशासनासमोर होते.एड्स नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भोसले यांनी यासाठी व्हॉट्स अॅपचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास रक्तदात्यांच्या गु्रपवर रक्तदानाचे आवाहन केले. याला साताºयातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. युवा मोरया संस्थेचे सदस्यांनी धाव घेऊन रक्तदान केले.सोमवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत नऊ रक्तदात्यांनी धाव घेऊन रक्तदान केले. त्यामुळे सर्वांचाच जीव भांड्यात पडला.ही किमया घडली व्हॉट्स अॅप समाजमाध्यमामुळे. रक्त सुरक्षा विभागाने सर्व प्रकारच्या रक्तगटनिहाय तसेच सामाजिक संघटनेने ‘आम्ही रक्तदाते’ नावाचा व्हॉट्स अॅप ग्रुप केला आहे. रक्ताची कोठे गरज असल्यास या गु्रपवर आवाहन केले जाते. त्यानंतर कोणी ना कोणी सदस्य रक्तदान करण्यासाठी जातो. या ग्रुपवर इतर कोणत्याही प्रकारचे संदेश टाकण्यासाठी मज्जाव आहेत. कोणी चुकून एखादा संदेश टाकला तर इतर मंडळी नियमांची आठवून करुन देतात. त्यामुळे ग्रुपचे चांगले काम सुरू आहे.हजारो रक्तदाते एकत्रजिल्हा रक्त सुरक्षा विभागाने सर्वच रक्तगटांचे स्वतंत्र तसेच काही तरुणांनी ‘आम्ही रक्तदाते’ हादेखील व्हॉट्स अॅप गु्रप तयार केला आहे. त्यातून हजारो रक्तदाते एकवटले आहेत. या गु्रपवर आवाहन केले की हे तरुण धावून येतात.
सातारकरांनी घडविली ‘निगेटिव्ह’ रक्ताची ‘पॉझिटिव्ह’ कहाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 10:53 PM