सातारा : येथील रविवार पेठेतील गुरुप्रसाद मोबाईल शॉपी फोडून नव्वद हजारांचा ऐवज लंपास करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ४७ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे. दरम्यान, शॉपी फोडणारी मुले अल्पवयीन असल्यामुळे त्यांना पुन्हा पालकांच्या स्वाधीन केले. याबाबतची स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेली माहिती अशी की, सचिन अशोक सराटे (वय ३४, रा. रविवार पेठ, सातारा) यांची रविवार पेठेतील शिवशक्ती कॉम्प्लेक्समध्ये असणारी गुरुप्रसाद मोबाईल शॉपी मंगळवार, दि. ४ ते बुधवार, दि. ५ या कालावधीत चोरट्यांनी फोडून दोन लॅपटॉप, एक प्रिंटर, चार स्पीकर, आठ मोबाईल, ऐंशी मोबाईल बॅटरी, साठ हेडसेट, तीस ब्लूटूथ हेडसेट, १७२ मेमरी कार्ड, १०३ चार्जर, स्क्रीन कार्ड असा नव्वद हजारांचा ऐवज लंपास केला होता. दरम्यान, संबंधित मोबाईल शॉपी दोन अल्पवयीन मुलांनी फोडल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यानंतर पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, हवालदार मोहन घोरपडे, पृथ्वीराज घोरपडे, उत्तम दबडे, विजय कांबळे, चालक राजेंद्र बोर्डे यांनी एकाला गोडोली तर दुसऱ्याला वनवासवाडी येथून ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)
मोबाईल शॉपी फोडणारी दोन अल्पवयीन मुले ताब्यात
By admin | Published: November 16, 2014 10:13 PM