सातारा : ‘अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेने देशभर पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील ग्रामीण सेवकांनीही संपूर्णपणे बंद पुकारला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील टपाल सेवा ठप्प झाली असून, संप लवकर मिटला नाही तर या संपाचा दहावी-बारावी बोर्डाच्या निकालावरही परिणाम होऊ शकतो,’ असे संघटनेचे राजकुमार चव्हाण यांनी सांगितले. ग्रामीण डाक सेवकांचा खात्यात समावेश करावा व त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सेवा सवलती मिळाव्यात, डाक खात्याचे महामंडळ करू नये, ग्रामीण सेवकांचे नियम व वेतन रचना निश्चित करण्यासाठी न्यायाधीशांची समिती नेमावी, आदी मागण्यांसाठी हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात या संपाचा मोठा परिणाम झाला आहे. या संपात जवळपास ६०० ग्रामीण कार्यालय बंद आहेत तर ९५0 हून अधिक ग्रामीण सेवक या संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण डाक सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सध्या दहावी-बारावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू आहे. उत्तरपत्रिका पोस्टात आल्या आहेत; पण त्या तपासणीसाठी जाण्यासाठी ग्रामीण सेवकांची आवश्यकता असते. जर या उत्तरपत्रिका वेळेवर तपासणीसाठी पोहोचल्या नाहीत तर बोर्डाचा निकाल वेळेवर लागणार नाही, त्यामुळे या संपाविषयी शासनाने तोडगा काढण्याची मागणीही संघटनेने केली. (प्रतिनिधी)
ग्रामीण भागात टपाल सेवा विस्कळीत
By admin | Published: March 15, 2015 12:14 AM