फलकनगरी : वाढदिवस, निवडीच्या शुभेच्छा देणाऱ्या फलकांची रेलचेल; महाविद्यालयांच्या कंपाऊंडवरही जाहिरातबाजीविद्यानगर : विद्यानगरमध्ये विविध शाखांचे शिक्षण देणारी महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये हजारो युवक-युवती शिक्षण घेत आहेत. मात्र, विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या या नगरीत ‘पोस्टर बॉईज’चा धुमाकूळ सुरू आहे. वाढदिवसासह सत्कार सोहळे व निवडीचे अनेक फलक महाविद्यालयांच्या परिसरात झळकत आहेत. या ‘पोस्टर बॉईज’मुळे विद्यानगरीची फलकनगरी बनण्याकडे वाटचाल सुरू आहे. कऱ्हाडनजीकचा विद्यानगर परिसर झपाट्याने विस्तारत आहे. काही वर्षांपूर्वी या परिसरात वास्तव्यास येणाऱ्यांची संख्या कमी होती. मात्र, सध्या मलकापूर पाठोपाठ विद्यानगरीला वास्तव्याच्या दृष्टीने पसंती दिली जात आहे. येथे विविध शाखांचे शिक्षण देणारी महाविद्यालये आहेत. प्राथमिक, माध्यमिक विद्यालये आहेत. या विद्यालय व महाविद्यालयांतून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यानगरमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश विद्यार्थी परगावचे अथवा ग्रामीण भागातील आहेत. तसेच परजिल्ह्यातील विद्यार्थीही अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र या महाविद्यालयांत शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयात शिकणाऱ्या या हजारो विद्यार्थ्यांवर छाप पाडण्यासाठी येथे सध्या ‘पोस्टर बॉईज’ तयार होत आहेत. मोठमोठे फलक लावून लक्ष वेधून घेण्याचा प्रकार नवीन नाही. मात्र, अलीकडे हे फॅड जास्तच वाढले असल्याचे दिसते. संबंधित फलकावर वयोवृद्धांसह अगदी पाळण्यातील मुला-मुलींचा फोटो छापण्याचा मोहसुद्धा आवरत नसल्यासारखी परिस्थिती आहे. बहुतांश फलकांवर मजकुरापेक्षा फोटोचेच प्रमाण जास्त असते आणि संबंधित फलक वाढदिवस किंवा तत्सम कार्यक्रमाच्या अनुषंगानेच लावलेले असतात. या फलकांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने अनेक दिवस ते फलक रस्त्याकडेला उभे असल्याचे पाहावयास मिळते. विद्यानगरमध्ये प्रवेश करताना कृष्णा कॅनॉलपासून फलकांची गर्दी पाहावयास मिळते. रस्त्याच्या दोन्ही बाजूस झाडावर, इमारतीवर किंवा इमारतीच्या संरक्षक भिंतीवर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेले हे फलक विद्यार्थ्यांसह प्रवाशांचेही लक्ष वेधून घेतात. महाविद्यालय हे ज्ञानदानाचे मंदिर असते. मात्र, याच ज्ञान मंदिराबाहेर अनेक फलकांची गर्दी दिसून येते. वाढदिवस फलकांबरोबरच जाहिरात फलकांचीही येथे रेलचेल असते. खासगी शिकवणी वर्ग, शिबिरे किंवा अन्य शिक्षणाशी निगडीत उत्पादनांचा प्रचार करण्याच्या दृष्टीने हे फलक लावण्यात आलेले आहेत. महाविद्यालयांच्या कंपाऊंडवरही या फलकांचा बाजार पाहावयास मिळतो. सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय, वेणुताई चव्हाण महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, औषधनिर्माण शास्त्र, अभियांत्रिकी महाविद्यालयासह अनेक शिकवणी वर्ग, सायबर कॅफे, स्टेशनरी दुकाने आदी सर्व शैक्षणिक साधने विद्यानगरीत उपलब्ध आहेत. मात्र, त्याच्यासमोरच फलक लावले जात आहेत. (वार्ताहर) फलकांचा अडथळा हटवणार कोण ?रस्त्याकडेला लावण्यात आलेल्या काही फलकांमुळे कधी-कधी वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. तसेच चित्रविचित्र रंगात असलेल्या या फलकांमुळे वाहनचालकांचे लक्षही विचलित होते. परिणामी महाविद्यालय मार्गावर लहान-मोठे अपघातही घडत आहेत. विद्यानगरमध्ये फलक लावण्यासाठी कुणाची परवानगी घेतली जाते? हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. विद्यानगर हे सैदापूर ग्रामपंचायतीच्या अखत्यारित आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने असे अनधिकृत फलक हटविणे गरजेचे आहे. मात्र, ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत असल्याने फलकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसते.
विद्यानगरीत ‘पोस्टर बॉईज’चा धुमाकूळ !
By admin | Published: May 25, 2015 10:47 PM