सातारा : पालिका निवडणुकीची चाहूल लागल्यापासून साताऱ्यातील भावी नगरसेवकांनी स्वत:ला समाजकार्यात वाहून घेतले आहे. आपल्या वाॅर्डात आपण किती सक्षम आहोत, हे जो-तो दाखवू लागला आहे. आता तर नेत्यांचे आपल्याकडे लक्ष जावे, पालिकेसाठी आपला विचार व्हावा, यासाठी शहरात फ्लेक्सबाजी सुरू झाली असून, त्यावर नेत्यांपेक्षा इच्छुकांचेच फोटो झळकू लागले आहेत.सातारा शहराची हद्दवाढ झाल्याने नगरसेवक संख्या ४० वरून ५० वर पोहोचली आहे. त्यामुळे पालिकेची पंचवार्षिक निवडणूक यंदा रंगतदार होणार आहे. शहराबरोबरच नव्याने हद्दीत आलेल्या दरे खुुर्द, शाहूपुरी, खेड, विलासपूर, शाहूनगर या भागातूनही यंदा नगरसेवकपदासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. मात्र, ज्या उमेदवारात निवडून येण्याची क्षमता आहे व जो सर्व बाजूंनी ‘सक्षम’ आहे, अशाच उमेदवाराचा तिकिटासाठी विचार केला जातो, हा आजरवरचा इतिहास आहे.
दरम्यान, आपल्या वाॅर्डात आपण कसे व किती सक्षम आहोत, हे जो-तो दाखवू लागला आहे. यासाठी विविध शिबिर, कार्यक्रम, विकासकामे मार्गी लावण्याचा सपाटा अनेकांनी सुरू केलाय. कधी नव्हे तो ‘मी तुमचाच आहे’ असे जनतेला अनेक जण पटवून देत आहेत. लोकांना काय हवे काय नको याची आस्थेवाईकपणे विचारपूस करीत आहेत. एकूणच जनतेच्या मनात आपली स्वच्छ प्रतिमा निर्माण करण्याचे काम भावी नगरसेवक करू लागले आहेत.हे काम आपल्या नेत्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीही लीलया पार पाडली जात आहे. आपल्या नेत्यांबरोबरच झळकण्याची एकही संधी पालिकेसाठी इच्छुक असलेला उमेदवार सोडत नाही. खा. उदयनराजे यांच्या वाढदिवसापूर्वीच संपूर्ण शहर शुभेच्छा फलकांनी बहरून गेले आहे. प्रथमच शहरात मोठ्या संख्येने असे फ्लेक्स लागले असून, त्यावर पालिकेसाठी इच्छुक असणाऱ्यांचे फोटोदेखील झळकू लागले आहेत.किती जणांना परवानगी?शहरात कोठेही फ्लेक्स बोर्ड लावण्यापूर्वी पालिकेची रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. शिवजयंतीमुळे दि. २१ व २२ रोजी फ्लेक्सबोर्डला परवानगी दिली जाणार असल्याचे अतिक्रमण विभागाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, तत्पूर्वीच शहरातील प्रमुख चौक, रस्ते शुभेच्छांच्या फ्लेक्सने गजबजून गेले आहे. काहींनी पालिकेची परवानगी घेतली असली तरी अनेकांनी परवानगीविनाच शहरात महाकाय फ्लेक्सबोर्ड उभे केले आहेत.