सातारा : साताऱ्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये दूरशिक्षण केंद्रामार्फत (बहिस्थ) अभ्यासक्रम प्रक्रिया चालविली जाते. अनेक विद्यार्थी हे परगावी नोकरीस असल्याने तसेच काहींना इतर कारणाने महाविद्यालयामध्ये नियमित शिकण्यासाठी येता येत नाही, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी बहिस्थ शिक्षणपद्धती राबवली जाते.
बहिस्थ विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रियेस जुलै महिन्यात सुरुवात होत असते. पदवीच्या प्रवेशप्रक्रियेसाठी १५ आॅगस्टपासून सुरुवात झाली असून, आॅगस्ट महिना संपत आला तरी पदव्युत्तरची प्रवेशप्रक्रिया अजून सुरू झाली नाही. पदव्युत्तरसाठी यूजीसीकडून मिळणाऱ्या मान्यतेला यावर्षी विलंब होत असल्याने प्रवेशप्रक्रिया लांबणीवर गेली असल्याचे बहिस्थ केंद्रचालकांकडून सांगितले जात आहे.
साताऱ्यातील बहुतांश युवक-युवती बारावीनंतर बाहेरगावी नोकरी करतात किंवा काहीजणांचा विवाह होतो, त्यामुळे त्यांना नियमित महाविद्यालयात जाता येत नाही. त्यासाठी पुढील शिक्षणासाठी ते दूरशिक्षण विभागात (बहिस्थ) प्रवेश घेतात आणि वर्षातून दोनवेळा होणाऱ्या परीक्षांना ते हजर राहतात. यावर्षी मात्र विद्यापीठाकडून यूजीसीच्या काही त्रुटींची पूर्तता करण्यासाठी विलंब झाला असल्या कारणाने पदव्युत्तरची प्रवेशप्रक्रिया रखडली गेली. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. सप्टेंबर महिन्यात प्रवेशप्रक्रिया सुरू झाली तर पुढचे दोन महिनेच विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शिल्लक राहतात. या दोन महिन्यांत परीक्षेची तयारी कशी करायची? असा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये उपस्थित होत आहे. याबाबत बहिस्थ महाविद्यालयांना यूजीसीने त्वरित मान्यता देऊन होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालक वर्गामधून होत आहे.पदवीसाठी मान्यता; पदव्युत्तर प्रवेशप्रक्रिया लांबणीवरपदवीच्या प्रवेशप्रक्रियेसाठी मान्यता भेटली असून, प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेसाठी अजून काही दिवसांचा विलंब लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.महाविद्यालयांतील पदव्युत्तरची विद्यार्थी संख्याछत्रपती शिवाजी महाविद्यालय : १५० ते २००
लालबहादूर शास्त्री :५० ते ८०मुधोजी कॉलेज, फलटण५० ते ६०धनंजयराव गाडगीळ महाविद्यालय : ८० ते १००दहिवडी कॉलेज दहिवडी :६० ते ७०डी.पी. भोसले कॉलेज, कोरेगाव ६० ते ७०
विद्यापीठाकडून यूजीसीच्या सर्व त्रुटींची पूर्तता करण्याचे काम चालू आहे. लवकरच पदव्युत्तर विभागाचीही प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात येईल. या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, याची पुरेपूर काळजी विद्यापीठ घेईल.- डॉ. भाऊसाहेब कराळे, प्राचार्य, छत्रपती शिवाजी महाविद्यालय