वरकुटे-मलवडी : कोरोनाच्या महाभयंकर महामारीने शहरांसह ग्रामीण भागातही हातपाय पसरले आहेत. माण तालुक्यातील खेड्यापाड्यात रुग्णसंख्या वाढत आहे. काही खबरदारी घेणारे जागरुक नागरिक स्वतःसह कुटुंंबाचीही काळजी घेत आहेत. मात्र, कोरोनाबाधितांच्या आकड्यासह उपचार घेणाऱ्यांमधील मृतांचा आकडादेखील वाढत आहे. साहजिकच सोशल मीडियावरून ओळखीच्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जातेय. मात्र, यातून रुग्णांसह नातेवाईकांना मानसिक तणावाला निमंत्रण मिळत आहे.
आठवड्यातून तीन-चारवेळा अशा पोस्ट वाचायला मिळत असल्याने, अनेकांना मानसिक तणावाला निमंत्रण मिळत आहे. सरकारी व खासगी कोरोना चाचणी अहवालानुसार शेकडोंच्या संख्येने जिल्ह्यासह तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. याबद्दल सोशल मीडियावर माण तालुका आरोग्य प्रशासन किंवा अन्य कोणाकडून तरी वेळोवेळी माहिती कळते. सध्या जिकडे बघावे तिकडे फक्त कोरोनाबद्दलच चर्चा, माहिती, उपचार याबाबत बोलले जात आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी प्रत्येकानेच देवाला साकडे घातले आहे. एखाद्या रुग्णाचे उपचारादरम्यान निधन झाले तर त्याच्या निधनाची पोस्ट सोशल मीडियावर जास्त प्रमाणात व्हायरल होत असते. दरम्यान, निधन झालेली व्यक्ती त्या परिसरात ओळखीची असल्याने भावपूर्ण श्रद्धांजलीच्या पोस्ट प्रत्येकाच्या मोबाईलवर शंभरहून अधिक असणाऱ्या ग्रुपवर अनेकदा फिरतात. कोरोनामुळे याचे निधन झाले, त्याचे निधन झाले, अशा चर्चा नेहमीच ऐकायला मिळतात.
सोशल मीडियावर निधन वार्तांची पोस्ट पडल्यावर भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून काहीजण दु:ख व्यक्त करतात. तालुक्यात आठवड्यातून किमान तीन ते चारजणांचे कोरोनामुळे निधन झाल्याचे कानावर पडते. या निधन झालेल्या व्यक्ती आपापल्या क्षेत्रात दिग्गज असतात अथवा तालुक्यात चांगल्यापैकी परिचित असतात किंवा त्या व्यक्तीचा हजारो लोकांचा जनसंपर्क असतो. कोरोनामुळे झालेल्या निधनाच्या भावपूर्ण श्रद्धांजलीची पोस्ट दृष्टीस पडताच अनेकांना खोलवर वेदना होतात. मग तो जवळचा सलगीतला असलाच किंवा लहानपणाचा मित्र, सोबती, वर्गमित्र असल्यास त्याच्या सहवासातील जुन्या आठवणी उफाळून येऊन अनेकजण दु:खी होत आहेत. त्यातल्या त्यात कोरोनाने निधन झालेली व्यक्ती आपल्यापेक्षा कमी वयाची असल्यास तर काहींच्या मनामध्ये अचानकपणे भीतीची भावना नैसर्गिकरित्या निर्माण होत आहे.
काहींनी व्हिडीओ बनवून त्याला भावनाविवश पार्श्वसंगीत दिलेेले असते. त्यामुळे आणखीनच मनात दु:ख होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या परिवारात हे दु:ख झाले आहे, त्या परिवाराला सांत्वनपर भेट देण्यासाठीसुद्धा कोरोनामुळे त्यांंच्या घरी जाता येत नाही. याची मोठी सल मनात असते. त्यामुळे सोशल मीडियावरून शेअर झालेल्या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या पोस्ट वाचून अनेकांना मानसिक तणावाला सामोरं जावं लागत आहे.
चौकट :
ओळखीच्या माणसाचे दु:खद निधन झाले तर खूपच वाईट वाटते. किमान तो दु:खाचा दिवस व पुढील दोन-तीन दिवस त्या व्यक्तीचा चेहरा, आठवण लवकर विसरणे शक्य होत नाही. कोरोना एवढी जीवाभावाची माणसं आपल्यातून हिसकावून नेईल, असं कदापीही वाटत नव्हतं. एखाद्या घरातील कर्ता माणूस जेव्हा जग सोडून जातो, त्यावेळी हा महामारीचा आजार किती भयावह आहे, याचा अंदाज आल्याशिवाय राहात नाही.