कऱ्हाड : जिल्ह्याच्या कोणत्याच भागात अद्यापही म्हणावा तेवढा मान्सूनचा पाऊस झालेला नाही. मात्र, तरीही संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. कऱ्हाड तालुक्यात कृष्णा व कोयना नदीकाठच्या तीस गावांना संभाव्य पुराचा धोका पोहोचू शकतो, असे महसूल विभागाच्या सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संबंधित गावांमध्ये आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी व पूररेषेतील कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. कऱ्हाड तालुक्यात कृष्णा व कोयना या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. त्याचबरोबर वांग, उत्तरमांड, दक्षिणमांड या उपनद्याही आहेत. कृष्णा नदीवर टेंभू येथे पाणी अडविण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याचा फुगवटा कोयना नदीपात्रामध्ये वारुंजी गावापर्यंत पोहोचत आहे. सध्या कृष्णा नदीतील पाणी पातळी कमी आहे. मात्र, जोरदार पाऊस झाल्यास ओढे, ओघळीतून वाहणारे पाणी कृष्णा व कोयना नदीत मिसळून नद्यांची पाणी पातळी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरवर्षी पावसाळ्यात जास्त पाऊस झाल्यास काही गावांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होते. काही गावांचा कऱ्हाडशी संपर्क तुटतो. संबंधित गावांना मदत पोहोचविणेही मुश्कील बनते. तसेच अचानक पाण्याची पातळी वाढल्यास पूररेषेतील कुटुंबांच्या जीविताला धोका पोहोचू शकतो. हे गृहीत धरून दरवर्षी आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करून पावसाळ्यापूर्वीच त्याबाबतची कार्यवाही सुरू केली जाते. यावर्षीही महसूल, पंचायत समिती, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस, वीज वितरण, आरोग्य विभाग यांच्यामार्फत संभाव्य आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा तयार करण्यात आला आहे. त्यासंदर्भात गत काही दिवसांपूर्वी बैठकही घेण्यात आली होती. प्रांताधिकारी किशोर पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीस तहसीलदार राजेंद्र शेळके, सहायक गटविकास अधिकारी मधुकर देशमुख, पालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांनी त्या-त्या विभागाचा आढावा मांडला. त्यावर मुख्याधिकारी किशोर पवार यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. आपत्ती काळात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये, असेही स्पष्ट केले. सध्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्यानुसार प्रत्येक विभागाकडून कार्यवाही करण्यात येत असल्याचे दिसते. (प्रतिनिधी) पुराचा धोका असणारी गावे कऱ्हाड शहर, गोटे, कापील, आटके, जाधवमळा, सयापूर, पाचवडवस्ती, गोळेश्वर, वारुंजी, टाळगाव, तांबवे, मालखेड, रेठरे खुर्द, म्होप्रे, आणे, येरवळे, चचेगाव, दुशेरे, शेरे, वाठार, रेठरे बुद्रुक, पोतले, कार्वे, कोडोली, पवारमळी, खुबी, गोंदी, खोडशी, साजूर या गावांना संभाव्य पुराचा धोका पोहोचण्याची शक्यता आहे.
कऱ्हाडसह तीस गावांना संभाव्य पुराचा धोका!
By admin | Published: June 27, 2016 11:09 PM