सातारा ,दि. ०६ : पोलिसदादांना कधी कोठे कामाला जावे लागेल याचा नेम नाही. रात्रभर काम केल्यानंतर पहाटे दमून-भागून घरी जायचं म्हटलं तरी खडतर मार्गावरुन जावे लागते. साताऱ्यातील गोळीबार मैदान पोलिस वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांना घरी जायचे म्हटले तरी दिव्यातून जावे लागते.
गोळीबार पोलिस वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनांची ये-जा होत असते. कायमच धावपळीचे जीवन जगत असणाऱ्या अनेक पोलिसांची त्यांच्या कुटुंबीयांची याच रस्त्यावरून ये-जा असते; मात्र या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकदा अनेक पोलिसांच्या गाड्यांना छोटे-मोठे अपघात झाल्याच्याही घटना घडल्या आहेत, असे असताना सुद्धा संबंधित विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप पोलिस कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी केला आहे.
रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांच्या गाड्यांचे नुकसान तर झालेच आहे. पण काही नागरिकांना मणक्याचे त्राससुद्धा होऊ लागल्याची चर्चा आहे, त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.