मलकापूर, दि. १ : आगाशिवनगरचे प्रवेशद्वार असलेल्या शिवछावा चौकात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मात्र, हा चौक वादाच्या हद्दीत सापडल्याने महामार्ग देखभाल तसेच सार्वजनिक बांधकामही त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या चौकाला दिवसेंदिवस बकाल स्वरूप प्राप्त होत आहे.
मलकापूर शहरातील आगाशिवनगरचे प्रवेशद्वार म्हणून येथील शिवछावा चौक परिचित आहे. त्याचबरोबर ढेबेवाडी खोऱ्यात ये-जा करणाऱ्या वाहनांची व ग्रामस्थांची नेहमीच याठिकाणी वर्दळ असते. हा चौक आगाशिवनगरचे विविध व्यवसायांचे केंद्रबिंदू बनले आहे.
कृष्णा रुग्णालयासह विविध शिक्षण संस्थांमुळे या चौकात नेहमीच गर्दी असते. अवजड वाहतुकीचा नेहमीच ताण असतो. त्यामुळे अशा मुख्य चौकातच रस्त्याची दुरवस्था होण्याचा प्रकार सातत्याने घडतो. डागडुजी किंवा चौकात एखादे विकासकाम करताना पूर्वीपासूनच त्रांगडे निर्माण होते.
स्थानिक प्रशासन म्हणून शहरातील कामांबाबत मलकापूर नगरपंचायत सर्वस्वी जबाबदार आहे. मात्र, शिवछावा चौकात रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यातील राष्ट्रीय महामार्गाचा उपमार्ग आहे. तर दुसऱ्या बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेला कऱ्हाड -ढेबेवाडी रस्ता आहे.
अशा त्रांगड्यात सापडलेल्या शिवछावा चौकातील कामांबाबत नेहमीच ससेहोलपट होत असते. हद्दीच्या वादात अनेकवेळा या चौकातील डागडुजीचे तसेच विकासाचे काम, अतिक्रमण हटाव मोहीम रखडते.
चौकातील केवळ ५० फुटाच्या पट्ट्याला वालीच कोण नसल्यासारखे झाले आहे. पावसाळ्यातही येथील खड्डे मुजविण्यासाठी दुर्लक्ष होत असते. नेहमीप्रमाणेच यावर्षी पावसामुळे चौकात खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे या ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ५० फुटांत शेकडो खड्डे निर्माण झाले आहेत. थोडा पाऊस पडल्यास खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनचालकांना तारेवरील कसरत करावी लागते. खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकवेळा अपघात घडत आहेत. या चौकातील दुर्दशेकडे महामार्ग देखभाल विभाग दुर्लक्ष करत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग हद्दीचे कारण सांगून रस्त्याची डागडुजी करीत नाही. तर कऱ्हाड -ढेबेवाडी रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आणि महामार्गाकडेचे उपमार्ग रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात असल्यामुळे स्थानिक प्रशासन म्हणून नगरपंचायतही याकडे लक्ष देत नाही.