सातारा : गेल्या महिनाभरापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे साताऱ्यातील रस्त्यांची प्रचंड दयनीय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना रस्त्यावरून जाताना नाकीनऊ येत होते. पालिकेने याची दखल घेऊन अखेर रस्त्यावरील खड्डे मुजविले.समर्थ मंदिर ते पोवई नाका या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. कास आणि बामणोलीला जाण्यासाठी पर्यटकांना याच रस्त्याचा वापर करावा लागत आहे. सततच्या वर्दळीमुळे रस्त्यावर पावसात मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. गेल्या महिन्यात समर्थ मंदिर येथे खड्ड्यात दुचाकी आदळून एक महिला आणि तिचे लहान मूल गंभीर जखमी झाले होते.
या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी अनेकदा रस्त्यावरील खड्डे भरावेत, अशी मागणी केली होती. मात्र, पालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात होता. पर्यटकांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. रस्त्यावरून चालत जाणे नागरिकांसाठी धोक्याचे होत होते.
काही नागरिकांनी नगरसेवक धनंजय जांभळे यांच्याकडे रस्त्यातील खड्डे भरावेत, अशी मागणी केली. त्यानंतर तत्काळ दुसऱ्या दिवशी समर्थ मंदिर परिसरातील सर्व खड्डे मुजविण्यास सुरुवात झाली. राजवाडा आणि समर्थ मंदिर परिसरातील सर्व खड्डे मुजविल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.