सातारा : शहरातील सगळ्यात रहदारीचा रस्ता म्हणून ओळखला जाणाऱ्या पोवई नाक्यावर उड्डाणपुलाच्या सर्वेक्षणासाठी केवळ तीन दिवसांसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. नेमकी वाहतूक कशी होते, अडथळे कोठे निर्माण होतात, यासह अन्य समस्यांचे बारकाईने लक्ष ठेवून उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात येणार आहे.आठ रस्ते एकत्रित मिळणाऱ्या व शहरातील वाहतुकीचा ताण असलेल्या शिवाजी सर्कल परिसरात उड्डाणपूल उभारण्याच्या प्रस्तावास गती मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उड्डाणपुलाच्या कामाचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने एका खासगी कंपनीच्या माध्यमातून पोवई नाक्यावरील वाहतुकीच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे.अपुरे रस्ते व वाढती वाहतूक यामुळे याठिकाणी उड्डाणपूल व्हावा, अशी सातारकरांची अनेक वर्षांची मागणी होती. खासदार उदयनराजे भोसले यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे उड्डाणपुलासाठी आग्रही मागणी केली होती. दरम्यान, गेल्या महिन्यात पोवई नाक्यावरील वाहतुकीच्या परिस्थितीची पाहणी करून अधिकाऱ्यांना यासंदर्भातचा प्रस्ताव करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उड्डाणपुलाच्या सर्वेक्षणाच्या कामाला गती मिळाली आहे.पोवई नाका परिसरात एकूण वीस सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तीन दिवस २४ तास हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वाहतुकीचे चित्रीकरण केल्यानंतर पोवई नाक्यावर कोणता मार्ग उड्डाणपुलाने जोडायचा हे ठरविण्यात येणार आहे. त्यानंतरच उड्डाणपुलासंदर्भातील आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)विना कंट्रोलरुमचे ‘सीसीटीव्ही’पोवई नाक्यावर केवळ तीन दिवसांसाठी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. या सीसीटीव्हीचे कोठेही कंट्रोलरूम नसून, हे चित्रीकरण रेकॉर्ड केले जाणार आहे. हे चित्रीकरण पाहूनच उड्डाणपुलासंदर्भात निर्णय होणार आहे. रात्री सुद्धा चित्रीकरण चांगले व्हावे, यासाठी चांगल्या प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सिग्नन सुटल्यानंतर काही वाहने सुसाट जातात. त्यामुळे अपघात होत असतात. सीसीटीव्हीमध्ये हे सर्व रेकॉर्ड होणार असल्याने या समस्येला आळा बसेल.
तीन दिवसांसाठी पोवई नाका सुरक्षित!
By admin | Published: March 04, 2015 10:22 PM