कुकुडवाड : देवापूरसह शेजारील परिसरात गत काही दिवसांपासून वीज कंपनीच्या सतत सुरू असलेल्या बत्तीगुल कार्यक्रमाचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तर शेतकरी वर्ग चिंतातूर बनला आहे. त्यामुळे वीज कंपनीने सुरू केलेला बत्तीगुल कार्यक्रम थांबणार कधी, असा संतप्त सवाल वीजग्राहक व शेतकरी विचारत आहेत.
वीज कंपनी अन् त्यांचा भोंगळ कारभार हा काही ग्राहकांसाठी नवा नाहीच. मात्र, सध्याचे उन्हाळ्याचे दिवस पाहता या दिवसात सतत जात असलेल्या विजेमुळे नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. तर प्रचंड उन्हामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठला आहे. दिवसभरात दोन ते तीन तासच विद्युत पंप चालवावा लागत असून, एवढ्या कालावधीतून मिळणाऱ्या पाण्यावर शेतीच भागवावे लागत आहे. अशा परिस्थितीत या परिसरातील शेतकरी काबाडकष्टाने आपली शेती पिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांच्या या प्रयत्नाला वीज कंपनीच्या गलथानपणाचा फटका बसू लागल्याने अनेक शेतकऱ्यांना डोळ्यांदेखत जळू लागलेली पिके पाहण्याची वेळ आली आहे. माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून जरी ओळखला जात असला तरी या दुष्काळावर मात करण्यासाठी या ठिकाणी झालेल्या जलयुक्तच्या कामामुळे अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींना काही प्रमाणात सध्यातरी पाणी आहे. याच्या आधारावरच येथील शेतकऱ्यांनी शेतात पिके धरली आहेत. ती पिके सध्या जोमात आली असताना त्यांना पाणी देण्यात वारंवार अडचणी येऊ लागल्या आहेत. शेतकऱ्यांना अगोदरच पाण्यासाठी विहिरीवरील नंबराची वाट पहावी लागते. अशावेळी त्यांच्या नंबरला जर वीज गेली तर मात्र कित्येक तास त्याला विजेची वाट पहावी लागत असून, असलेली वीजही पुरेशा दाबाने उपलब्ध नसल्यास तो विद्युत पंपाच्या साह्याने आपल्या शेतीला पाणीही व्यवस्थित देऊ शकत नाही. आज अशा परिस्थितीमुळे माण परिसरातील असंख्य शेतकऱ्यांची पुरती वाट लागली आहे. त्यांना पुरेशा दाबाने वीज उपलब्ध होत नसल्याने काही ठिकाणी पाणी असूनही केवळ विजेअभावी पिके जळू लागली आहेत. गत काही दिवसांपासून तर देवापूरसह अनेक परिसरात तर विजेचा खेळखंडोबा सुरू झाला आहे.
१३देवापूर
फोटो ओळी - देवापूर(ता. माण) परिसरातील जळालेली पिके.