दरम्यान, याबाबत महावितरणच्या मुंढे कार्यालयात तक्रारी देऊनही अधिकारी गांभीर्याने दखल घेत नाहीत. त्यासाठी सभासद शेतकऱ्यांनी एकत्रित बैठक घेऊन शुक्रवारी (दि. २६) महावितरणच्या मुंढे कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार पाटील यांनी दिली.
वीज वितरणच्या मुंढे कार्यालयाला टाळे ठोकतेवेळी भोळेवाडी, म्होप्रे, बेलदरे येथील सभासद मोठ्या संख्येने आपल्या जनावरांसह उपस्थित राहून धरणे आंदोलन करणार आहेत. बेलदरेतील ही योजना १९८६पासून कार्यरत आहे. योजनेस ५४० अश्वशक्तीचा दाब आहे. या संस्थेचे १३५ अश्वशक्तीचे ४ पंप आहेत. कमी वीज दाबामुळे फक्त २ पंप दिवसा चालत आहेत. योजनेवर दरसाल ५०० एकर ऊस पीक आहे. गत पाच ते सहा वर्षे संस्थेने तक्रार करूनही महावितरण दखल घेत नाही. महावितरणची आजअखेर आलेली सर्व वीजबिले संस्थेने नियमित भरलेली आहेत.
कमी वीज दाबामुळे पंप जळणे, गळती होणे, स्टार्टर जळणे, पॅनल बोर्ड जळणे आदी घटना घडत आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. याबाबत वीज वितरणचे कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांच्याकडे तक्रारीही करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याची दखल न घेतल्याने अखेर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.